या पाचही जणांची चौकशी केली असता घटनेच्या दिवशी २३ मे ला राजा रघुवंशीची हत्या कशी झाली? याची सविस्तर माहिती समोर आली आहे. सोनमने सिग्नल दिल्यानंतर राजा रघुवंशीसोबत हिंदीतून गप्पा मारणाऱ्यांनीच राजाची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनम रघुवंशीने लग्न झाल्यानंतर पाचव्या दिवशीच राजाची हत्या करण्याचा कट रचला होता. यासाठी एका कॅफेत बैठक घेतली आणि इथेच राजाच्या हत्येचं प्लॅनिंग करण्यात आलं. यासाठी आरोपी प्रियकर राजने आपले मित्र आकाश राजपूत, आनंद कुर्मी आणि विशाल चौहाण यांना कटात सामील करून घेतलं. यानंतर आकाश, आनंद आणि विशालने मिळून राजाची हत्या केली.
advertisement
राजा रघुवंशीचा खून कसा झाला?
घटनेच्या दिवशी २३ मेला सोनम फोटो शूट करण्याच्या बहाण्याने राजाला घेऊन कोरसा परिसरात घेऊन गेली. हा सगळा डोंगराळ भाग असून या परिसरात लोकांची वर्दळ अत्यंत कमी असते. याठिकाणी जात असताना तिन्ही आरोपी हिंदीतून गप्पा मारत दोघांमध्ये मिसळले. मेघालयात हिंदी बोलणारे पर्यटक मिळाल्याने राजाही त्यांच्याशी गप्पा मारण्यात दंग झाला. काही अंतर पुढे गेल्यानंतर सोनमने थकली असल्याचा बहाणा केला आणि ती पाठिमागे चालू लागली. तर तिन्ही आरोपी आणि राजा गप्पा मारत काही अंतर पुढे गेले.
याचवेळी आसपास कुणी नसल्याचं पाहून सोनमने राजाची हत्या करण्याचा सिग्नल दिला. 'याला मारून टाका' असं ती ओरडून म्हणाली. सोनमने सिग्नल देताच राजासोबत गप्पा मारणाऱ्या आनंद, आकाश आणि विशालनं सोबत आणलेली हत्यारं काढली. तिन्ही जणांनी विशालच्या डोक्यात वार केले. काही कळायच्या आत हल्ला झाल्याने राजा स्वत:चा बचाव करू शकला नाही. घाव वर्मी लागल्याने राजा जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यानंतर आरोपींनी राजाचा मृतदेह जवळच्या दरीत फेकून घटनास्थळावरून पळ काढला.