अयोध्या : प्रभू रामाचे जन्मस्थळ असलेल्या अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या प्रतिष्ठापना कार्यक्रमाचा उत्साह संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी जवळपास झाली आहे. देश आणि जगभरातील राम भक्त या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. त्यातच या भव्य दिव्य आणि ऐतिहासिक कार्यक्रमाला प्रत्येक जण विविध भेटवस्तू देत आहेत.
यामध्ये महाराष्ट्रातील तांब्याच्या कलशातून प्रभू रामाचा जलाभिषेक होईल. तर कन्नौजच्या अत्तराने राम मंदिर परिसर सुगंधित होईल. कन्नौजहून आलेल्या अत्तर व्यावसायिकाने राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना विविध प्रकारच्या परफ्यूम अर्पण केले.
advertisement
राम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्यात संपूर्ण देशाचा सहभाग असेल. त्यामुळेच विविध ठिकाणचे रामभक्त प्रभू रामाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अनेक भेटवस्तू अर्पण करत आहेत. 22 जानेवारी रोजी जेव्हा प्रभू राम त्यांच्या भव्य आणि दिव्य अशा महालात विराजमान होतील, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभू राम यांच्यासह तेथे उपस्थित 8000 ऋषी-संत हे कन्नौजच्या अत्तराचा सुगंध घेतील.
फुलांनी बनवले आहे विशेष अत्तर -
कन्नौजनगरी ही अत्तरसाठी प्रसिद्ध आहे. कन्नौज येथून आलेले व्यावसायिक सगन यांनी सांगितले की, आम्ही कन्नौज येथून अत्तर घेऊन आले आहेत. 22 तारखेला होणाऱ्या प्रतिष्ठापना कार्यक्रमात याचा वापर केला जाईल. सर्व नैसर्गिक फुलांपासून हे अत्तर तयार करण्यात आले आहे. यामध्ये केवडा, गुलाब, खस, चंदनाचे अत्तर आहे, बेलाच्या अत्तराचा समावेश आहे. तर अशाप्रकारे अनेक प्रकारचे अत्तर आम्ही राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्याकडे दिले आहेत. महासचिव चंपत राय यांनी हे अत्तर 22 जानेवारीला होणाऱ्या महासोहळ्यात वापरले जावे, यासाठी तेथे उपस्थित पुजाऱ्यांकडे सोपवले.