शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सप्टेंबर महिन्यात दिल्लीत मोठ्या घडामोडी होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यांनी काही राजकीय समीकरणांकडे सूचक इशारा केला होता. तर, दुसरीकडे आता आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी मोठा दावा केला आहे.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केला होता. निवडणूक आयोगाच्या मदतीने मतांची चोरी होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी काही पुरावेही सादर करत मतदार यादीतील घोळ समोर आणला. आता त्यावरून वायएस रेड्डी यांनी मोठा दावा केला आहे.
advertisement
वायएस यांचा दावा काय?
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे सर्वेसर्वा जगनमोहन रेड्डी यांनी मोठा दावा केला आहे. रेड्डी यांनी काँग्रेस नेते, विरोधी पक्ष नेते राहुल गांधींवर थेट निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी हे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्या माध्यमातून हॉटलाइनवर चंद्राबाबू नायडू यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट रेड्डी यांनी केला.
...म्हणून मतचोरींवर राहुल यांची दुटप्पी भूमिका...
रेड्डी यांनी पुढे म्हटले की, “राहुल गांधी ‘मतचोरी’बाबत बोलतात, पण आंध्र प्रदेशाबाबत एक शब्दही काढत नाहीत. इथे तर सर्वाधिक मतफरक आहे. जाहीर झालेल्या आकड्यांपेक्षा मतमोजणीच्या दिवशी मोजलेल्या मतांमध्ये 12.5 टक्क्यांचा फरक आहे. मग यावर ते का बोलत नाहीत? असा सवाल त्यांनी केला.
राहुल गांधी आंध्र प्रदेशबाबत बोलतच नाहीत. चंद्राबाबू नायडू त्यांच्याशी रेवंथ रेड्डीच्या माध्यमातून थेट संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला. जे स्वतःच्या कृतीत प्रामाणिक नाही, अशा व्यक्तीवर मी काय भाष्य करावं? असा टोलाही रेड्डी यांनी लगावला.