वाटाघाटींशिवाय युद्धाचा शेवट नाही
पंतप्रधान मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले की, युक्रेन आपल्या मित्र देशांसोबत कितीही चर्चा करू शकतो, पण जोपर्यंत रशिया आणि युक्रेन एकत्र बसून वाटाघाटी करत नाहीत, तोपर्यंत शांतता प्रस्थापित होणार नाही.
माझे रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी चांगले संबंध आहेत. मी राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना सांगू शकतो की हा युद्धाचा काळ नाही. त्याचप्रमाणे, मी राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांनाही सांगू शकतो की, कितीही देश तुमच्या सोबत असले तरी युद्धाच्या मार्गाने समाधान मिळणार नाही, असे पंतप्रधान मोदींनी ‘लेक्स फ्रिडमन पॉडकास्ट’मध्ये सांगितले.
advertisement
युद्ध संपवण्यासाठी सध्या योग्य संधी
पंतप्रधान मोदी यांनी असेही नमूद केले की, आधी शांततेसाठी वाटाघाटी करणे कठीण होते, मात्र सध्याची परिस्थिती योग्य संधी देत आहे. युक्रेन आणि रशियाने एकत्र बसून चर्चा केली तरच युद्ध संपुष्टात येईल. युक्रेन आपल्या मित्रदेशांसोबत कितीही चर्चा करत असला तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. युद्धाचा शेवट करण्यासाठी दोन्ही पक्षांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे मोदी म्हणाले.
भारत फक्त शांततेच्या बाजूने
युद्धावर भारताची भूमिका स्पष्ट करताना मोदी म्हणाले, या युद्धात अनेकांचे हाल झाले आहेत. जागतिक दक्षिण देशांनाही याचा मोठा फटका बसला आहे. संपूर्ण जग अन्न, इंधन आणि खत संकटाने त्रस्त आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र येऊन शांततेसाठी प्रयत्न करावेत. मी कोणत्याही बाजूने नाही, पण माझी भूमिका शांततेच्या बाजूने आहे. माझी भूमिका तटस्थ नाही, तर शांततेसाठी ठाम आहे.
झेलेन्स्की युरोपकडून पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नात
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत २८ फेब्रुवारीला झालेल्या वादानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की युरोपकडून पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. झेलेन्स्की यांनी लंडनमध्ये युकेचे पंतप्रधान कीअर स्टार्मर आणि अन्य युरोपीय नेत्यांची भेट घेतली. या बैठकीत युक्रेनला मदत करण्याच्या धोरणांवर चर्चा करण्यात आली आणि तयार करण्यात आलेला शांतता प्रस्ताव अमेरिकेसोबत शेअर करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा परिस्थितीत रशियासोबत शांतता वाटाघाटी करण्यासाठी बसण्याची पंतप्रधान मोदींची सूचना महत्त्वाची ठरते.
युक्रेन आणि अमेरिकेने नुकतीच सौदी अरेबियामध्ये ३० दिवसांसाठी युद्धविरामाच्या प्रस्तावावर चर्चा केली होती. झेलेन्स्की यांनी या प्रस्तावास संमती दिली, मात्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अद्याप त्यावर मान्यता दिलेली नाही. पुतिन यांनी या प्रस्तावाच्या अंमलबजावणीबाबत चिंता व्यक्त केली आहे आणि या कालावधीत युक्रेन आपली सैन्यशक्ती पुन्हा एकत्रित करण्याचा प्रयत्न करेल की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.