5 दिवस म्हणजेच 120 तास उलटून गेले तरी अद्याप बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात यश आलं नाही. याबाबत मदत आणि बचाव कार्यात गुंतलेल्या अधिकार्यांनी सांगितलं की, ‘बोगद्याच्या दिशेने मातीच्या ढिगाऱ्यातून पाईप्स पुढे ढकलण्यासाठी खोदकाम करण्यात येत असून त्यासाठी जास्त वेळ लागतोय.हे काम करताना वेल्डिंगनंतर पाईप्सला तडे जाणार नाहीत, याचीही खात्री करावी लागतेय.’
advertisement
खोदकाम करताना वापरण्यात येणाऱ्या मशीनला चार ते पाच मीटर प्रतितास अपेक्षित ड्रिलिंग वेग गाठता येत नसल्याने मजुरांना बाहेर काढण्यासाठी वेळ लागत आहे. याबाबत नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचआयडीसीएल) चे संचालक अंशू मनीष खालखो यांनी सांगितले की, ‘मशीनवरील पाईप्स अलाइन करणे आणि त्यांना वेल्डिंग करण्यास वेळ लागतोय.’
ड्रिलिंग मशीनमुळे वेळ
खालखो यांनी पुढे दावा केला की, ‘ड्रिलिंग मशिन डिझेलवर चालत असल्यामुळे बचावकार्याची गती मंदावली आहे. हे एक बंद जागेत काम करू शकणारे डिझेलवर चालणारे मशीन आहे. त्यामुळे कॉम्प्रेसरसह विशिष्ट वेळेच्या अंतराने व्हेंटिलेशनची देखील आवश्यकता आहे. या प्रक्रियांमुळे निर्माण होणारं कंपन संतुलन बिघडवू शकतं. आम्ही एका रणनीतीवर काम करत आहोत, पण त्यामध्ये काहीही चूक होणार नाही याची खात्री करण्यासाठी ती रणनीती योग्यप्रकारे अंमलात आणावी लागेल.'
बॅकअप मशीन मागवण्याचे काम सुरू
खालखो म्हणाले की, ‘सध्या मशीन समाधानकारकपणे काम करत आहे, आणि ढिगाऱ्यातून पुढे जाण्याच्या कामात प्रगती होत आहे. बचावाचे काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना या सिस्टिमची सवय झाल्यामुळे कामाचा वेग वाढेल. बचावकार्य अखंडपणे सुरू राहावे, यासाठी इंदूरहून बॅकअप म्हणून आणखी एक 'ऑगर मशीन' आणलं जातं आहे.’
बचावकार्य करणाऱ्या एजन्सी
नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (एनडीआरएफ), स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (एसडीआरएफ), बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) आणि इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) यासह अनेक एजन्सीचे किमान 165 कर्मचारी बचाव कार्यात गुंतले आहेत. थायलंड आणि नॉर्वेची विशेष बचाव पथकंही या मोहिमेत सामील झाली आहेत.
दरम्यान, बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असून ही मोहीम लवकरच यशस्वी होण्याची चिन्हे आहेत.