महाविकास आघाडीत अजूनही जागा वाटपाचा तिढा सुटला नाही. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात काही जागांवरून वाद सुरू आहे. जवळपास 15 जागांवर हा तिढा कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी देखील हा तिढा सोडवण्यासाठी लक्ष घातले आहे. जागा वाटपावर चर्चा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाने अजून आपली यादीदेखील जाहीर केली नाही.
advertisement
राजन साळवींना राजापूरमधून उमेदवारी...
राजापूरचे आमदार राजन साळवी यांना एबी फॉर्म देण्यात आला. राजन साळवी हे 24 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. कुडाळ-मालवण विधानसभेचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना देखील एबी फॉर्म देण्यात आला आहे. वैभव नाईक यांच्या प्रतिनिधीने एबी फॉर्म स्वीकारला आहे. ज्या जागांवर महाविकास आघाडीत कोणतेही वाद नाहीत, अशा ठिकाणच्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानेदेखील यादी जाहीर करण्यापूर्वी एबी फॉर्म देण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईतील कोणत्या जागांवर वाद…
ठाकरे गट आणि काँग्रेस यांनी मुंबईतील तीन जागांवर दावा केला आहे. यामध्ये भायखळा, वांद्रे पूर्व आणि वर्सोवा या जागांचा समावेश आहे. 2019 च्या निवडणुकीत भायखळामध्ये शिवसेनेचा आणि वांद्रे पूर्वमध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. तर, वर्सोवामध्ये भाजपची सरशी झाली होती. भायखळा आणि वांद्रे पूर्वमधील दोन्ही पक्षांचे आमदार आता आपल्या मूळ पक्षासोबत नाहीत.
