गेल्या काही वर्षापासून मुंबई लोकलमध्ये वाढत्या गर्दीमुळे अनेक अपघात होत आहेत आणि प्रवाशांचा जीवही जात आहे. याचा विचार करून केंद्र सरकारने स्वयंचलित दरवाजे असलेल्या नॉन एसी लोकल तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
या नवीन लोकल ट्रेनचे काम चेन्नईतील इंटेग्रल कोच फॅक्टरीमध्ये सुरू आहे. आतापर्यंत मुंबईच्या उपनगरीय नेटवर्कवर 3000 लोकल ट्रेन धावत आहेत, त्यामध्ये एसी आणि नॉन एसी दोन्ही प्रकारच्या लोकलचा समावेश आहे. आता या नेटवर्कवर दोन नवीन स्वयंचलित दरवाजे असलेल्या नॉन एसी लोकल तयार केल्या जात आहेत. या लोकलमुळे प्रवास करताना प्रवाशांना अधिक सुरक्षितता मिळणार आहे.
advertisement
काही दिवसांपूर्वी झाला होता भयंकर अपघात
मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा येथे काही वर्षांपूर्वी लोकल अपघात झाला होता. त्यात लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर स्वयंचलित दरवाजे असलेल्या लोकल सुरू करण्यासाठी चाचणी प्रक्रिया सुरू झाली होती.
रेल्वे मंत्री यांची माहिती
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की,राष्ट्रीय वाहतुकीसाठी ऑटोमॅटिक डोअर-क्लोजर सिस्टम असलेल्या दोन नॉन एसी लोकल ट्रेनसेट विकसित केले जात आहेत. या लोकल चेन्नईतील आयसीएफमध्ये तयार होतील. आयसीएफसोबत मिळून स्वयंचलित दरवाजे, दोन डब्यांमधील जोडणीसाठी वेस्टिब्युल्स, छतावरील व्हेंटिलेशन युनिट बसवले जाणार आहे.
या लोकलमध्ये प्रवास करताना एसी लोकलप्रमाणेच अनुभव मिळेल फक्त त्यात एसी नसणार आहे. प्रवास सुरक्षित होणार आहे आणि मुंबईकरांना गर्दीतून पडण्याचा धोका कमी होईल.
सध्या मुंबई उपनगरीय मार्गावर 17 एसी लोकल धावत आहेत. रेल्वे मंत्रालयाने 12 कोच असलेल्या 238 लोकल रॅक तैनात करण्यास मंजुरी दिली आहे. या रॅकसाठी 19,293 कोटी रुपये मंजूर झाले आहेत आणि खरेदी प्रक्रिया सुरू आहे.
