लोकसभा निवडणुकीमध्ये संधी नाकारण्यात आलेले आणि पराभूत झालेल्या मुंबईतील काही माजी खासदारांची विधानसभेत जाण्याची इच्छा असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातील काहींची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. तर, काहींच्या उमेदवारीबाबत अद्याप सुस्पष्टता नाही.
कोणते चेहरे चर्चेत?
भाजपचे माजी खासदार गोपाळ सेट्टी, मनोज कोटक, शिवसेना शिंदे गटाचे संजय निरूपम, राहुल शेवाळे, काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. आता त्यापैकी कितीजणांना पुन्हा तिकीट मिळणार, हे काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
advertisement
उमेदवारीसाठी का तर्क?
गोपाळ शेट्टी हे मुंबई उत्तरचे खासदार होते. मात्र, त्यांच्या ऐवजी भाजपने केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना उमेदवारी दिली. आता, गोपाळ शेट्टी हे बोरिवली विधानसभेतून सुनील राणे यांच्याऐवजी उमेदवारी मागत आहे. सूत्रांच्या माहितीसाठी शेट्टीसाठी भाजपच्या एका नेत्याने प्रयत्न सुरू केले आहेत. तर, दुसरीकडे काँग्रेसकडून प्रिया दत्त यांना निवडणुकीच्या उतरवण्याची तयारी असल्याचे म्हटले जात आहे. वांद्रे पश्चिम मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. सध्या या ठिकाणी भाजपचे आशिष शेलार आमदार आहेत. मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून यावेळी काँग्रेसने माजी खासदार प्रिया दत्त यांच्याऐवजी आमदार वर्षा गायकवाड यांना संधी दिली होती. वर्षा गायकवाड या विजयी झाल्या. वांद्रे पश्चिम भाग हा संमिश्र वस्तींचा आहे. या ठिकाणी अनेक सेलिब्रेटी, उच्चभ्रू वर्गासोबत मध्यमवर्ग, कष्टकरी वर्गदेखील आहे. प्रिया दत्त यांच्या लोकसभा मतदारसंघाचा हा भाग होता. त्याचा फायदाही प्रिया दत्त यांना होण्याची शक्यता आहे.
शिवसेना शिंदे गटात असलेले संजय निरुपम हे आधी एकसंध शिवसेना त्यानंतर काँग्रेसकडून खासदार राहिले आहेत. त्यांनी सध्या मुंबईतील दिंडोशी मतदारसंघातून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र, या ठिकाणी भाजपचे राजहंस सिंह हेदेखील प्रयत्नशील आहेत. सध्या या ठिकाणी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू आमदार आहेत. तर, लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले शिंदे गटाचे माजी खासदार राहुल शेवाळे हे देखील चेंबूरमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
