शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्यांवर भाष्य केले. राऊत यांनी म्हटले की, लोकसभेला 400 पारची घोषणा देण्यात आली होती. पण, त्याचे निवडणुकीत काय झाले हे आपण पाहिले आहे. लोकांनी गुप्त पद्धतीने मतदान केले आहे. या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी पैसे वाटले पण महाराष्ट्राचा स्वाभिमान असणार असल्याचे त्यांनी म्हटले. जनतेने महाराष्ट्रासाठी मतदान केले असल्याचे राऊत यांनी म्हटले.
advertisement
संजय राऊत यांचा एक्झिट पोल काय?
खासदार संजय राऊत यांनी एक्झिट पोलबाबत बोलताना सांगितले की, एक्झिट पोल हा फ्रॉड आहे. हरियाणामध्ये काँग्रेस 60 च्या वर जागांवर विजयी होईल असे सांगण्यात आले. पण, त्याचे काय झाले असा सवाल त्यांनी केला. राज्यात महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्यावतीने 23 नोव्हेंबर रोजी सत्तेवर दावा करणार आहोत. तर, 26 नोव्हेंबर रोजीच सत्ता स्थापन करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
मविआच्या सरकारचे मुख्यमंत्री कोण?
महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज आणि उद्या बैठक असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रीपदाबाबत एकत्र बसून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले. नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदावर केलेल्या दाव्यावर त्यांनी म्हटले की, नाना पटोले हे नेतृत्व करणार असतील तर त्यांच्या नावाची घोषणा काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनी करायला हवी असा टोलाही त्यांनी लगावला.
