'ढगफुटी'ने हाहाकार; 5 एकरवरचं सोयाबीन पाण्यात, लातूरच्या सुरेश चव्हाण यांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश, PHOTO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. सुरेश चव्हाण यांचे पाच एकर पीक पाण्यात गेले. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत हतबल झाले आहेत.
advertisement
1/7

शशिकांत पाटील, प्रतिनिधी लातूर: अवकाळी पावसाचा लहरीपणा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही. दिवाळी उलटून गेल्यानंतरही लातूर जिल्ह्याला पावसाने पुन्हा एकदा अक्षरशः झोडपून काढले आहे. अनेक दिवसांच्या मेहनतीने काढणी केलेले सोयाबीनचे ढीग शेतात जमा असताना, अचानक आलेल्या या पावसाने शेकडो शेतकऱ्यांचे स्वप्न क्षणात उद्ध्वस्त केले.
advertisement
2/7
अनेक शेतकऱ्यांचे ढीग वाहून गेले, तर उर्वरित ढीग पाण्याखाली गेले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात तर अक्षरशः ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या अतिवृष्टीचा सर्वात मोठा फटका गरसोळी येथील शेतकरी सुरेश चव्हाण यांना बसला.
advertisement
3/7
सुरेश चव्हाण यांनी पाच एकर जमिनीवरील सोयाबीन पीक कापून शेतात ढीग रचून ठेवले होते. मात्र, जोरदार पावसामुळे हे सगळे ढीग पाण्यात बुडाले आहेत. हाता-तोंडाशी आलेले पीक पाण्यात गेल्याचे पाहून सुरेश चव्हाण यांचा धीर सुटला. साचलेल्या पाण्यात लोळण घेत त्यांनी हताशपणे आक्रोश केला आणि मोठा टाहो फोडला.
advertisement
4/7
सुरेश चव्हाण यांच्या या वेदनादायक आक्रोशाने शेतीत सुरू असलेल्या संकटाचे भीषण चित्र उभे केले. आक्रोश करताना ते म्हणाले, "सरकारने मदत जाहीर केली आहे, पण ती अद्याप मिळालेली नाही. आमची दिवाळी अंधारात गेली आणि आता जे काही हाताशी आले होते, ते काढलेले सोयाबीनही पाण्यात गेले. आता जगायचं कसं?"
advertisement
5/7
एकीकडे नैसर्गिक संकटे आणि दुसरीकडे शासकीय मदतीची दिरंगाई यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. लातूर शहरासह जिल्ह्यातील निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ आणि औसा तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
advertisement
6/7
दिवाळी उलटूनही पाऊस थांबत नसल्याने शेतीत मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. खरीप हंगाम पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांचे लक्ष आता रब्बी हंगामातील पेरण्यांवर लागले होते. मात्र, शेतात पाणी साचून राहिल्यामुळे रब्बी हंगामातील पेरण्या आता लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
advertisement
7/7
या गंभीर परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत आणि गरसोळीसारख्या गंभीर घटनांमध्ये तातडीने भरीव मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
'ढगफुटी'ने हाहाकार; 5 एकरवरचं सोयाबीन पाण्यात, लातूरच्या सुरेश चव्हाण यांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश, PHOTO