Ganeshotsav 2025: दगडूशेठ गणपतीला पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती, आकर्षक रोषणाईने उजळला परिसर, खास PHOTOS
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
या विशेष वर्षानिमित्त मंडळाने केरळमधील प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिराची भव्य प्रतिकृती साकारून भाविकांसाठी अनोखा नजारा निर्माण केला आहे.
advertisement
1/7

लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठापना आज गणेश चतुर्थीला मोठ्या उत्साहात झाली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या उत्सवाला यंदा 133 वर्षे पूर्ण होत आहेत. या विशेष वर्षानिमित्त मंडळाने केरळमधील प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिराची भव्य प्रतिकृती साकारून भाविकांसाठी अनोखा नजारा निर्माण केला आहे.
advertisement
2/7

पद्मनाभस्वामी मंदिर हे केरळ राज्याच्या तिरुअनंतपुरम येथे आहे. हे भगवान विष्णूंना समर्पित असलेलं अतिशय प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर श्री वैष्णव परंपरेतील 108 दिव्य ठिकाणांपैकी एक पवित्र स्थान मानले जाते.
advertisement
3/7
याच मंदिराची तेजस्वी झलक यंदा पुण्यातील गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे. पद्मनाभस्वामी मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. भाविकांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.
advertisement
4/7
दगडूशेठ ट्रस्टने साकारलेली प्रतिकृती सुमारे 100 फूट उंच, 120 फूट लांब आणि 90 फूट रुंद असून तिची रचना पाहणाऱ्यांना थक्क करणारी आहे. प्रतिकृतीत 5 थरांचं भव्य गोपूर असून प्रत्येक थरात नाजूक शिल्पकलेचा अप्रतिम संगम आहे. त्यात कृष्णलीला, रामायण, सप्तऋषी, हत्ती, घोडे आणि सिंह यांची देखणी सजावट आहे. गाभाऱ्यात भगवान विष्णू-लक्ष्मी, शिव-पार्वती, श्रीकृष्ण आणि नृसिंह यांच्या सुंदर मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
advertisement
5/7
मुख्य मखराच्या वरच्या भागात अष्टकोनी गाभारा साकारला असून, त्यामध्ये भगवान पद्मनाभस्वामींची निद्रिस्त अवस्थेत असलेली भव्य मूर्ती आहे. गाभारा सोनेरी रंगाने सुशोभित केला असून, सभामंडपातील छताचा भाग अष्टकोनी स्वरूपात बांधण्यात आला आहे. संपूर्ण रचनेत 30 भव्य खांब आहेत, तर ठिकठिकाणी 500 देवी-देवता आणि ऋषी-मुनी यांच्या मूर्ती आहेत.
advertisement
6/7
मंडपाची रचना अशी केली आहे की, भाविकांना लांबूनही बाप्पाचे दर्शन घेणं सहज शक्य होईल. सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत ठेवण्यात आली असून, गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर आणि अंतर्गत भागात आकर्षक विद्युत सजावटही केली आहे.
advertisement
7/7
या भव्य प्रतिकृतीचं कला-दिग्दर्शन विनायक रासकर यांनी केलं असून, मंडपाची संपूर्ण व्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे. सुमारे 30 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर ही भव्य कलाकृती उभी राहिली आहे. पारंपरिकता आणि आधुनिक शिल्पकलेचा अप्रतिम संगम या प्रतिकृतीत दिसतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Ganeshotsav 2025: दगडूशेठ गणपतीला पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती, आकर्षक रोषणाईने उजळला परिसर, खास PHOTOS