दुकानाच्या बंद शटरमागे 61 जणांचा होरपळून कोळसा; काळजाचा थरकाप उडवणारे अग्नितांडवाचे PHOTO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
कराचीच्या RJ शॉपिंग प्लाझामधील दुबई क्रॉकरी दुकानातील भीषण आगीत ६१ मृत्यू, ७३ बेपत्ता, प्रशासनाची निष्काळजीपणा आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन उजागर.
advertisement
1/11

ज्या दुकानातून सुखाचा संसार सजवण्यासाठी वस्तू खरेदी केल्या जाणार होत्या, त्याच दुकानातील क्रॉकरी आज मृत्यूचा साक्षीदार ठरली. भीषण आगीच्या ज्वाळांपासून स्वतःला वाचवण्यासाठी काही निष्पाप जीवांनी दुकानाचे शटर खाली ओढले, काळोखात एकमेकांचे हात धरले आणि आगीच्या तांडवापासून वाचण्यासाठी प्रार्थना केली. पण दुर्दैवाने, तेच शटर त्यांच्या आयुष्याचं शेवटचं दार ठरलं.
advertisement
2/11
धुराचे लोट आणि वाढत्या उष्णतेने त्या बंद खोलीतच ६१ जणांचा गुदमरून आणि होरपळून अंत झाला. एका क्षणात डझनावारी हसते-खेळते संसार राख झाले आणि मागे उरला तो फक्त काळजाचा थरकाप उडवणारा आक्रोश.
advertisement
3/11
कराची दक्षिणचे उप महानिरीक्षक (DIG) असद रजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या मधल्या मजल्यावरील 'दुबई क्रॉकरी' नावाच्या दुकानातून एकाच वेळी ३० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
advertisement
4/11
आगीने रौद्र रूप धारण केल्यानंतर दुकानदार आणि ग्राहकांनी आगीपासून वाचण्यासाठी दुकानाचे शटर बंद करून स्वतःला आत कोंडून घेतले होते. मात्र, आगीच्या उष्णतेने आणि विषारी धुराने या सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिवसभरात ढिगाऱ्याखालून आणखी मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, आतापर्यंत अधिकृत मृतांची संख्या ६१ वर पोहोचली आहे.
advertisement
5/11
सिंध पोलीस सर्जन डॉ. सुम्मैया सय्यद यांनी सांगितले की, "बाहेर काढलेले मृतदेह इतक्या वाईट अवस्थेत अक्षरश: कोसळसा झालेले आहेत की त्यांची ओळख पटवणे ही एक मोठी आव्हान आहे." अनेक मृतदेहांची ओळख आता डीएनए चाचणीनंतरच पटू शकणार आहे.
advertisement
6/11
प्रशासनाने आतापर्यंत ७३ बेपत्ता व्यक्तींची अधिकृत यादी जाहीर केली आहे. यामध्ये १० वर्षांच्या बालकांपासून ६९ वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, बेपत्ता असलेल्यांमध्ये १६ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे, जे तिथे कामाला होते किंवा खरेदीसाठी आले होते.
advertisement
7/11
इमारतीचा काही भाग अजूनही धगधगत असल्याने आणि ढिगारा मोठा असल्याने मृतांचा आकडा १०० च्या पुढे जाण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कराचीचे महापौर मुर्तझा वहाब यांनी सांगितले की, पीडित कुटुंबांकडून मिळालेल्या माहितीनुसार बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे.
advertisement
8/11
या भीषण दुर्घटनेने प्रशासकीय निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला आहे. कराचीचे आयुक्त सय्यद हसन नकवी यांनी स्पष्ट केले की, या इमारतीमध्ये अग्निप्रतिबंधक उपाययोजना नावापुरत्याही नव्हत्या.
advertisement
9/11
धक्कादायक बाब म्हणजे, वरिष्ठ वकील आबिद मतीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीचे बांधकाम आणि सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाबाबत न्यायालयात आधीच तीन खटले प्रलंबित होते. मात्र, वेळीच कारवाई न झाल्याने आज शेकडो जीव टांगणीला लागले आहेत.
advertisement
10/11
मुख्य अग्निशमन अधिकारी हुमायूं खान यांच्या मते, ही आग इतकी भीषण आहे की इमारतीचा संपूर्ण सांगाडा आता कमकुवत झाला आहे. बेपत्ता लोकांचा शोध घेणे आणि ढिगारा उपसणे यासाठी किमान १० ते १५ दिवसांचा कालावधी लागू शकतो. आगीमुळे कोट्यवधींच्या मालमत्तेचे नुकसान झाले असून संपूर्ण इमारत आता नष्ट झाली आहे.
advertisement
11/11
हे भीषण अग्नितांडव पाकिस्तानमधील कराची शहराच्या दक्षिण भागातील एका गजबजलेल्या व्यापारी संकुलात, RJ शॉपिंग प्लाझा घडलं आहे. मंगळवारी लागलेल्या या आगीने पाहता पाहता संपूर्ण बहुमजली इमारतीला विळखा घातला. अरुंद रस्ते आणि इमारतीत असलेल्या ज्वलनशील वस्तूंमुळे आगीने रौद्र रूप धारण केले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/विदेश/
दुकानाच्या बंद शटरमागे 61 जणांचा होरपळून कोळसा; काळजाचा थरकाप उडवणारे अग्नितांडवाचे PHOTO