संयमी थोरातांनी सुनावले, शिंदे-फडणवीसांना म्हणाले- कर्माची फळे भोगावी लागतील
भाजपा आणि महायुतीच्या वाचाळवीरांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला आहे. पुरोगामी महाराष्ट्राची सुस्कृंत राजकीय परंपरा संपवण्याचा उद्योग २०१४ ला सुरु झाला तो रोज खालच्या पातळीवर जात आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते दररोज महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळीमा फासत आहेत आणि त्यांचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या वाचाळवीरांना मूक पाठिंबा आहे हे अत्यंत धोकादायक आहे.
advertisement
मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या जय मालोकरचा मृत्यू कसा झाला? PM रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांच्यावर त्वरित कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालणारे त्यांच्या पक्षाचे नेते त्यांच्या एवढेच दोषी आहेत. संजय गायकवाड, अनिल बोंडेंना तर जनता शिक्षा तर देईलच पण यांच्या कर्माची फळं यांना पाठीशी घालणाऱ्या नेत्यांनाही भोगावी लागणार आहेत.
भाजपच्या नेत्यांना सत्तेचा माज चढलाय, पटोलेंचा हल्ला
भाजपचा खासदार डॉ. अनिल बोंडे याला लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्याबद्दल कोणती भाषा वापरायची याची अक्कल नसावी. बुलढाण्याचा शिंदेंचा आमदार संजय गायकवाड, अक्कल नसलेला, गुंड प्रवृत्तीचा माणूस, त्याला आमदार म्हणावं का असाही प्रश्न पडतो. पण राज्यसभेचे खासदार असलेल्या अनिल बोंडेंसारख्या सुशिक्षित माणसानं पण राहुल गांधींविषयी बोलताना तमा बाळगू नये.. म्हणजे भाजपच्या नेत्यांमध्ये मस्तवालपणा ठासून भरला आहे हे स्पष्ट होते. मात्र भाजपचे शीर्षस्थ नेते आताही गप्पच राहणार आहेत काय? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
याआधीही तरविंदरसिंह मारवाहनं पक्षाचा झेंडा हाती घेऊन राहुल गांधींना थेट जीवे मारण्याची धमकी दिली होती. तर दुसऱ्यांदा चक्क केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी राहुल गांधींचा उल्लेख दहशतवादी म्हणून केला होता. तेव्हाही आपलं तोंड शिवलं होतं. आपण काहीही न बोलणं हे आपलेही संस्कार दाखवतात. आज तरी बोलणार का? नाही बोललात तर एवढं लक्षात ठेवा, लोकसभेला कुबड्यांवर सत्ता मिळवलीत, महाराष्ट्र विधानसभेला कुबड्याही मिळणार नाही अशी परिस्थिती मतदारराजा आपली करून ठेवेल, असा इशारा नाना पटोले यांनी दिला.
आक्षेपार्ह विधाने करण्याचा महायुतीतील नेत्यांना छंद, विश्वजीत कदम यांनीही सुनावले
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्यायला चाललेल्या भाजपा खासदार अनिल बोंडे यांच्या बुद्धीची कीव वाटते. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या आ. संजय गायकवाड यांनी राहुलजींची जीभ छाटण्याची भाषा केली आणि लगोलग चटके देण्याची भाषा करीत बोंडे यांनी त्यावर कळसच केला.
भारताच्या सर्वांगीण व शाश्वत प्रगतीसाठी प्रसंगी प्राणांची आहुती देणाऱ्या गांधी परिवाराने सोसलेले चटके हे महायुतीचे नेते बहुतेक विसरले असावेत. काम कमी पण बाष्कळ बडबड जास्त यालाच महायुतीतील नेतेमंडळी अग्रक्रम देत आली आहेत. कोणाविषयी काय बोलावे याचे ताळतंत्रच यांना राहिलेले नाही. काँग्रेस नेत्यांबद्दल विशेषतः गांधी परिवाराबद्दल आक्षेपार्ह विधाने करण्याचा महायुतीतील नेत्यांना छंदच लागला आहे. मात्र हा छंद जास्त काळ टिकणार नाही. येणाऱ्या काळात हा छंद त्यांच्या सत्तेतील पायउताराचे निश्चितच मुख्य कारण असेल, असे विश्वजीत कदम म्हणाले.
