उद्धव ठाकरे हे सभेसाठी वणी येथे दाखल झाले असता निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. आता उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ अमोल कोल्हेंच्याही बॅगेची तपासणी निवडणूक अधिकाऱ्यांनी केली आहे. अमोल कोल्हे हे विटा येथे सभेला जात असताना त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली.यावेळी अमोल कोल्हे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तर सुप्रिया सुळेंच्या कारची तपासणी झाल्याची माहिती स्वत: सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
advertisement
सुप्रिया सुळेंची कार तपासली
सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझी पण काल गाडी चेक केली.जरूर आमचं सगळं चेक करावे. उद्धवजींची कशाला केली ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेत हे दुर्दैवी आहे. अतिशय चुकीचं आहे
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
उद्धव ठाकरे निवडणूक अधिकाऱ्यांना म्हणाले, माझी बॅग तपासत आहात, बरोबर आहे. माझ्या अगोदर तुम्ही कोणाची बॅग तपासली? माझ्या दौऱ्यापूर्वी कोणत्या राजकीय नेत्याची बॅग तुम्ही तपासली आहे. तुम्ही चार महिन्यात एकाचीही नाही तपासली म्हणत आहात. मीच तुम्हाला पहिल्यांदा सापडलो. माझी बॅग तपासा मी तुम्हाला अडवत नाही. आतापर्यंत तुम्ही मिधेंची बॅग तपासली का? देवेंद्र फडणवीसची बॅग तपासली का? मोदी आणि अमित शाहांची बॅग तपासली का?
अमोल कोल्हे काय म्हणाले?
अमोल कोल्हे म्हणाले, आज पुन्हा बॅग तपासली गेली, विधानसभा निवडणुकीदरम्यान दुसऱ्यांदा तपासणी झाली. आजच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेबांचीही तपासणी झाली. नियम असतात हे मान्य आहे, पण नियम फक्त विरोधी पक्षांनाच असतात अन् सत्ताधाऱ्यांना सगळीकडे मोकळं रान असतं हे मान्य नाही. कायदा आहे, तर तो समानच असला पाहिजे.