मुंबई: राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रभाग रचना, आरक्षण जाहीर झाल्याने काही ठिकाणी निवडणुकीच्या तारखांची उत्सुकता लागली आहे. पंचायत समिती ते जिल्हा परिषद, महापालिकांच्या निवडणुका पार पडणार असल्याने मोठ्या प्रमाणावर प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. इच्छुकांनी आपल्या उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे. मात्र, वसई विरार महापालिकेची निवडणूक लांबणीवर जाण्याची चिन्ह आहेत. या निवडणूक प्रक्रियेविरोधात कोर्टात एक नव्हे चार याचिका दाखल करण्यात आले आहे.
advertisement
वसई-विरार महापालिकेची प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया गती घेत होती. मात्र आता दाखल झालेल्या चार याचिकांमुळे संपूर्ण निवडणुकीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या या याचिका निवडणुकीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आक्षेप घेत असल्याने, आगामी सार्वत्रिक निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
>> उच्च न्यायालयात कोणत्या याचिका दाखल?
पहिली याचिका गावे वगळण्याच्या अध्यादेशाविरोधात दाखल करण्यात आली आहे. तर , दुसरी पालघर जिल्हा परिषद गट व वसई पंचायत समिती गणातील २९ गावे समाविष्ट न केल्याबाबतची आहे. तिसरी वसई-विरार महापालिकेच्या प्रभाग रचनेविरोधात आहे. चौथी याचिका ही पेसा कायद्याचे उल्लंघन झाल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आली आहे.
वसई-विरार महापालिकेची स्थापना 2009 मध्ये चार नगरपरिषदा आणि काही ग्रामपंचायती एकत्र करून करण्यात आली होती. मात्र त्यातील 29 गावांनी सुरुवातीपासून महापालिकेत समावेशाला विरोध दर्शवला होता. राज्य सरकारने 2011 मध्ये या गावांना वगळणारी अधिसूचना काढली होती, पण नंतर न्यायालयीन लढाई सुरू राहिली. अखेर ऑगस्ट 2025 मध्ये राज्य शासनाने पुन्हा ही 29 गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेत, प्रलंबित प्रश्न निकाली काढला आणि निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला होता.
सुप्रीम कोर्टाची मुदत ओलांडणार?
सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व महापालिकांच्या निवडणुका पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. तरी, वसई-विरारमधील प्रकरण वेगळं वळण घेतलं आहे. न्यायालयाने या सर्व याचिका 30 ऑक्टोबरपूर्वी निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, पेसा कायद्याशी संबंधित याचिकेमुळे तांत्रिक गुंतागुंत वाढल्याने, वसई-विरार महापालिकेची निवडणूक वेळेत होईल का? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.