मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरानजीक असलेल्या चौवीसवाडी परिसरात राम स्मृती सोसायटी नावाची एक रहिवासी इमारत आहेत. या इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या दरम्यान एक लिफ्ट अडकल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळाली होती. तसेच या लिफ्टमध्ये एका बारा वर्षांचा मुलगा अडकल्याची माहिती देखील अग्निशमन दलाला देण्यात आली.
दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून लिफ्टमधून मुलाची सुटका केली. मुलाचा पायापर्यंतचा भाग लिफ्टतच्या दारात अडकला होता. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. हा प्रकार लक्षात येताच मुलाला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.
advertisement
मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्या चिमुकल्या मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, मुलाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लिफ्टमध्ये नेमका काय बिघाड झाला? मुलगा लिफ्टमध्ये कसा अडकला? याचा तांत्रिक तपास पोलीस करत आहेत.