मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा भागात बजरंग दलाचा कार्यकर्ता आपल्या घरात असताना काही रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी त्याच्या घरात घुसून त्याला मारहाण केली. आरोपींनी तरुणाला घराबाहेर ओढत आणत तिथेही लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी तरुणाला जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप कार्यकर्त्याकडून करण्यात आला आहे. ही सर्व घटना परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
advertisement
या घटनेनंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पाच आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पाचही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही मारहाण नेमकी कशामुळे झाली? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र जुन्या वादातून हा हल्ला केल्याचं सांगितलं जातंय.
समोर आलेल्या सीसीटीव्ही व्हिडीओत पाच तरुण बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला घरातून ओढून बाहेर घेऊन येताना दिसत आहे. बाहेर आणल्यानंतर त्याच्या कॉलरला पकडून लाथा बुक्क्यांनी त्याला मारहाण होत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. पुण्यात अशा प्रकारे घरात घुसून मारहाण आणि धमक्या देण्याचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.