संतोष अमित जाधव असं २२ वर्षीय जखमी तरुणाचं नाव आहे. तो मुळचा नांदेड जिल्ह्यातील गंगानगर येथील रहिवासी आहे. घटनेच्या रात्री तक्रारदार तरुण कामानिमित्त नांदेडहून पुण्यात आला होता. रेल्वेतून उतरून बाहेर पडताना तीन अनोळखी तरुणांनी त्याला अडवले आणि पैशांची मागणी केली. तक्रारदाराने पैसे देण्यास नकार दिला.
यानंतर आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर एका आरोपीने चाकू काढून थेट तक्रारदाराच्या पोटात वार केला. या हल्ल्यात तक्रारदार गंभीर जखमी झाला. हा सगळा प्रकार नऊ सप्टेंबरला पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकाच्या 'फलाट क्रमांक एक' जवळील व्हीआयपी सायडिंग परिसरात घडला.
advertisement
जखमी अवस्थेत तक्रारदाराला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेनंतर बंडगार्डन पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध जबरी चोरी आणि जीवघेणा हल्ल्याचा गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू आहे. पण नांदेडवरून पुण्यात आलेल्या एका तरुणावर अशाप्रकारे हल्ला झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.