आयुष कोमकर हत्या प्रकरणात शिवराज , शुभम , अभिषेक आणि लक्ष्मी आंदेकर यांना गुन्हे शाखेने सोमवारी न्यायालयात हजर केलं.. पोलिसांनी गुजरातमध्ये धडक देऊन यांना अटक केली होती. या चौघांना ही १८ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, बंडू आंदेकर याने कोर्टात मोठा दावा केला आहे. पोलिसांकडून आपल्याला बेदम मारहाण केल्याचं त्याने कोर्टात सांगितलं आहे. शिवाय पोलिसांनी गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.
advertisement
खरंतर, आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकरचा मुलगा आणि मयत माजी नगरसेवक वनराज आंदेकरचा भाऊ कृष्णा आंदेकर मास्टरमाइंड असल्याचं सांगण्यात येत आहे. कृष्णा आंदेकरच्या सांगण्यावरूनच आयुषची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणातील सर्व आरोपी पोलिसांना सापडले आहेत. मात्र या प्रकरणातील मास्टरमाइंड कृष्णा आंदेकर अद्याप फरार आहे. यावरूनच पोलिसांनी आपल्याला धमकी दिल्याचा दावा बंडू आंदेकरने कोर्टात केला आहे.
"कृष्णाला पोलिसांसमोर हजर व्हायला सांग, नाहीतर त्याला गोळ्या घालतो", अशी धमकी पोलिसांनी दिल्याचा दावा बंडू आंदेकरने केला आहे. एवढंच नव्हे तर पोलीस आम्हाला पोलीस कोठडीमध्ये त्रास देत आहेत. मागील 4 ते 5 दिवसांपासून पोलिसांनी आम्हाला आंघोळ करू दिली नाही, ब्रश करू दिला नाही, असाही दावा केला आगे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने काल सुरुवातीला अटक केलेल्या 8 आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.