मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बारामती तालुक्यातील पारवडी येथील इंगळे वस्तीवर बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. या घटनेमध्ये सौरभ विष्णू इंगळे या 24 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणात तालुका पोलिसांनी प्रमोद रामचंद्र इंगळे आणि रामचंद्र जगन्नाथ इंगळे या दोघांना रात्री उशिरा ताब्यात घेतले. विशेष म्हणजे सौरभला मारहाण केल्यानंतर प्रमोद इंगळे व रामचंद्र इंगळे हे दोघेजण तालुका पोलीस ठाण्यात येऊन सौरभ विरोधात फिर्याद देऊन गेले होते, मात्र या दरम्यान सौरभला बारामतीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते.
advertisement
याप्रकरणी पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांनी माहिती दिली ती अशी, बाथरूम माझ्या जागेत बांधले, असा सौरभ चा दावा होता. यावरून इंगळे वस्तीवर सौरभ इंगळे याने प्रमोद आणि रामचंद्र इंगळे यांना जाब विचारला. याचे पर्यावसन भांडण झाले. या भांडणात प्रमोद आणि रामचंद्र इंगळे या दोघांनी सौरभला बेदम मारहाण केली. यानंतर सौरभच्या चुलत भावांनी सौरभला बारामती दवाखान्यात आणले.
या दरम्यान आपल्याला मारहाण होत असल्याची माहिती सौरभने पोलिसांना दिली होती. बारामतीतील दवाखान्यात आणल्यानंतर त्याची प्रकृती आणखी बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी प्रमोद इंगळे व रामचंद्र इंगळे या बापलेकाला ताब्यात घेतले. पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.