काय आहे 'तो' मास्टर प्लॅन?
सध्या पुणे स्थानकावरून 50 ओरिजनेटिंग (प्रवास सुरू होणाऱ्या) रेल्वे गाड्या धावतात. पुढील पाच वर्षांत ही संख्या 60 ने वाढवून 110 पर्यंत नेण्याचा रेल्वेचा मानस आहे. याशिवाय पुण्याहून धावणाऱ्या 75 रेल्वे गाड्यांना एकूण 198 अतिरिक्त डबे जोडले जाणार आहेत. यामुळे सुमारे 20 हजार प्रवाशांची अतिरिक्त सोय होणार आहे. नवीन 60 रेल्वे गाड्यांमुळे जवळपास दीड लाख प्रवाशांना प्रवासाचा फायदा होईल.
advertisement
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशातील प्रमुख 48 रेल्वे स्थानकांची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूर या स्थानकांचा समावेश आहे. पुणे स्थानकाच्या विकासासाठी पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात काम केले जाणार आहे. मात्र पुणे स्थानक परिसरात जागेची मर्यादा असल्याने रेल्वे प्रशासनाने दोन सॅटेलाइट स्थानकांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासोबतच आळंदी,उरुळी आणि फुरसुंगी येथे मेगा कोचिंग टर्मिनल उभारले जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात पुण्याहून रेल्वे गाड्यांची संख्या वाढली तरी पुणे स्थानकावर ताण येणार नाही. या मास्टर प्लॅनमुळे पुढील पाच वर्षांत केवळ पुणेच नव्हे तर परिसरातील इतर स्थानकांवरही मोठ्या प्रमाणात सुविधा वाढतील. रेल्वे गाड्या आणि डब्यांची संख्या वाढल्याने प्रवाशांची गैरसोय कमी होईल आणि वेटिंग तिकिटांचे प्रमाणही घटण्यास मदत होणार आहे.
