महापालिकेच्या आरोग्य विभाग, घनकचरा व्यवस्थापन, आणि सुरक्षा विभागात सर्वाधिक कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. अनेक वर्षांपासून या कामगारांकडून बोनस आणि भत्त्यांची मागणी केली जात होती.मात्र, प्रत्येकवेळी प्रशासकीय कारणांमुळे ही मागणी पुढे ढकलली जात होती. यंदा आयुक्तांच्या पुढाकारामुळे अखेर कामगारांना त्यांच्या दीर्घकालीन मागण्यांची पूर्तता होत आहे.
'या' कर्मचाऱ्यांना मिळणार नाही लाभ
महापालिकेच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कुशल कामगारांना रजा वेतन आणि घरभाडे मिळणार आहे. मात्र, ज्यांचा पगार 21 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे अशा कर्मचाऱ्यांना बोनसचा लाभ मिळणार नाही. तरीदेखील त्यांच्या पगारात इतर भत्त्यांच्या स्वरूपात वाढ होणार आहे.
advertisement
कुशल कामगारांच्या पगारात दरमहा सुमारे 2 हजार 310 रुपयांची तर अकुशल कामगारांच्या पगारात तब्बल 3 हजार 775 रुपयांची वाढ होईल. या वाढीमध्ये बोनस, घरभाडे आणि रजा वेतनाचा समावेश असेल. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मासिक उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊन त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महापालिकेच्या विविध विभागांत सध्या मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. या निर्णयामुळे त्यांचा मनोबल वाढेल, तसेच कामकाजात अधिक कार्यक्षमतेने सहभागी होतील असे प्रशासनाचे म्हणणे आहे. कामगार संघटनांनी या निर्णयाचे स्वागत करत आयुक्तांचे आभार मानले आहेत. दिवाळीपूर्वी आलेल्या या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या घरात सणासुदीचा आनंद दुपटीने वाढला आहे.
महापालिका प्रशासनाकडून भविष्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी आणखी कल्याणकारी निर्णय घेण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काळात कंत्राटी कामगारांचे मनोबल आणि स्थैर्य अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.