या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी परराज्यातील टोळीला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २९ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. नसरुल बिलाल मोहम्मद (२३), संजीव कुमार श्रीसेवाराम वर्मा (३७), फईम अहमद शरीफ अहमद शेख (४२) आणि वारीस फकीर मोहम्मद (३५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. यापैकी तिघे आरोपी नवी दिल्लीचे रहिवासी असून, एक आरोपी लोहगाव, पुणे येथील आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी असल्याचं भासवत होते. त्यासाठी ते पालिकेचे हेल्मेट, रिफ्लेक्टिंग जॅकेट, बॅरिकेट्स आणि इतर साहित्य वापरत होते. यामुळे कोणालाही त्यांच्यावर संशय येत नव्हता. याचाच फायदा घेत ते शहरातील विविध भागांमधून ते बीएसएनएलच्या लँडलाईनच्या अंडरग्राउंड केबल्सची चोरी करत होते. आतापर्यंत त्यांनी लाखो रुपयांच्या अंडरग्राऊंड केबल्सची चोरी केली आहे.
या चोरांनी अनेक ठिकाणी अशा प्रकारे केबल्सची चोरी केल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर चतुःश्रृंगी पोलिसांनी तपास सुरू केला आणि सापळा रचून या टोळीला रंगेहात पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या क्रेन, टेम्पो, रिक्षा, तसेच चोरीला गेलेला माल आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वावरण्यासाठी वापरण्यात येणारे सर्व साहित्य जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत २९ लाख ३५ हजार ७५० रुपये इतकी आहे.
या कारवाईमुळे शहरातील केबल चोऱ्यांच्या अनेक घटनांचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, या टोळीचा आणखी काही गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का? याचा शोध घेतला जात आहे.