बँक दरोड्यात अनेकदा दरोडेखोर प्लॅन करतात व नंतर बँकेवर दरोडा टाकून पैसे लुटतात. 2018मध्ये असा काही प्रकार घडला, ज्यात फेक ऑनलाइन बँक ट्रान्झॅक्शन्स आणि एटीएम मशीनच्या माध्यमातून कॉसमॉस बँकेतून तब्बल 94 कोटी रुपये चोरण्यात आले. तब्बल सात तास हा खेळ सुरू होता. विशेष म्हणजे चोरांसमोर बँक प्रशासन पूर्णपणे हतबल झाल्याचं दिसत होतं. एटीएम मशिनमधून एकापाठोपाठ एक ट्रान्झॅक्शन्स होत होती; पण ती रोखण्यात बँकेला अपयश येत होतं. जगातल्या 28 देशांमधल्या एटीएम मशीनमधून पैसे काढण्यात आले. हा हॅकिंगचा प्रकार सायबर चोरांनी पुण्यात बसून केला होता.
advertisement
11 ते 13 ऑगस्ट 2018 दरम्यान घडला होता प्रकार
बँक हॅकिंगचा हा प्रकार 11 ते 13 ऑगस्ट 2018 या कालावधीत घडला होता. बँक लुटण्याचा हा खेळ 11 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता सुरू झाला. त्याच दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत हा खेळ सुरू होता. चोरीचा हा प्रकार रोखण्यासाठी अनेक टीम्स प्रयत्न करत होत्या. बँकेच्या ग्राहकांपर्यंतही ही माहिती पोहोचली होती. कारण अकाउंटमधून पैसे डेबिट होताच एक ऑटो जनरेटेड मेसेज ग्राहकांना जात होता. सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं होतं. कधी एक लाख, कधी दोन लाख, कधी दहा-दहा लाखांची ट्रान्झॅक्शन्स होत होती. रात्री दहा वाजेपर्यंत बँकेतून सुमारे 80 कोटी रुपये काढण्यात आले होते. भारतात 2089 बँकिंग व्यवहार झाले आणि ग्राहकांच्या अकाउंट्समधून एकट्या भारतातून 2.50 कोटी रुपये काढण्यात आले होते. लुटलेल्या पैशांमधल्या मोठा हिस्सा हाँगकाँगमधल्या बँकेत हस्तांतरित करण्यात आला होता.
(crime : माहेरी जाण्यास केला विरोध, बायकोने एका बुक्कीत फोडला नवऱ्याचा डोळा, बुब्बुळ काढलं बाहेर!)
त्यानंतर 13 ऑगस्ट 2018 रोजी पुन्हा असाच काहीसा प्रकार घडला. स्विफ्ट सिस्टीमद्वारे आणखी 14 कोटी रुपये चोरले गेले. त्यामुळे बँकिंग क्षेत्रातलं हे सर्वांत मोठं हॅकिंग ठरलं. कारण 11 व 13 ऑगस्ट 2018 या काळात तब्बल 94 कोटी रुपये चोरले गेले होते. ही लूट कोणी केली, हे तेव्हा समोर आलं नव्हतं; मात्र आता तब्बल पाच वर्षांनंतर पुण्यातल्या 18 जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 5 कोटी 72 लाखांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केलाय.
अशी केली होती चोरी
कॉसमॉस सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयाचा सर्व्हर गुन्हेगारांनी हॅक केला. सर्व्हर हॅक झाल्यानंतर ग्राहकांची संपूर्ण बँकविषयक माहिती मिळवण्यात आली. ग्राहकांच्या डेबिट कार्डचे तपशील हॅकर्सपर्यंत पोहोचले आणि त्यानंतर जगभरातल्या 28 देशांतल्या वेगवेगळ्या एटीएम मशीन्समधून एकामागून एक पैसे काढले जाऊ लागले. या प्रकाराने बँक प्रशासनाची झोप उडाली. सुमारे 500 ग्राहकांचं डेबिट कार्ड क्लोन करण्यात आलं होतं. हॅकर्सना रोखण्यासाठी आयटी टीम प्रयत्न करीत होती; पण त्यांना यश येत नव्हतं. बँकेतल्या ग्राहकांच्या अकाउंटमधून प्रत्येक मिनिटाला पैसे जाऊ लागले. ग्राहकांचं बँक अकाउंट रिकामं होऊ लागलं. सात तासांत 28 देशांमध्ये सुमारे 12 हजार बँक व्यवहार झाले. कुठे ऑनलाइन व्यवहार झाले, कुठे एटीएम मशीनमधून पैसे काढले गेले. आतापर्यंतचा हा देशातला सर्वांत मोठा सायबर हल्ला समजला जातो. आजही या हल्ल्याची चर्चा होत असते.