गेल्या 75 वर्षांपासून घरगुती गणेशमूर्तींचा व्यवसाय करणारे देसाई बंधू आंबेवाले हे या परंपरेतले एक महत्त्वाचे नाव. त्यांच्या सुबक, आकर्षक आणि रेखीव मूर्ती केवळ पुण्यातच नव्हे, तर जगभरात पसंत केल्या जात आहेत. मागील काही वर्षांत परदेशात गणेशमूर्तींची मागणी झपाट्याने वाढली आहे. विशेषतः आखाती देश, अमेरिका, दुबई, लंडन आणि ऑस्ट्रेलिया या ठिकाणी गणेशोत्सवाची लोकप्रियता वाढत चालली आहे.
advertisement
या वर्षी आत्तापर्यंत 200 हून अधिक मूर्ती परदेशात पाठवण्यात आल्या आहेत. मागणीतील वाढ लक्षात घेता ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक मंदार देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मागणीत तब्बल 50 ते 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
महाराष्ट्रातील बरेच लोक कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी परदेशात राहतात. पण मातृभूमीशी असलेली त्यांची नाळ तुटत नाही. गणेशोत्सव सुरू होताच परदेशातही मंडळे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते. अमेरिकेत, आखाती देशांमध्ये किंवा ऑस्ट्रेलियात राहणारे मराठी मंडळी इथल्या वातावरणासारखाच माहोल तयार करण्याचा प्रयत्न करतात. मूर्ती ऑर्डर करून काही महिन्यांपूर्वीच त्यांची वाहतूक सुरू होते.
गणपतीची मूर्ती परदेशात पाठवण्याची प्रक्रिया साधारण 8 ते 10 दिवसांची असते. मूर्ती सुरक्षित पोहोचावी यासाठी पॅकिंगवर विशेष लक्ष दिले जाते. तसेच, वाहतुकीत होणारे कंप, तापमानातील बदल यांचा मूर्तीवर परिणाम होऊ नये यासाठी दर्जेदार साहित्य वापरले जाते. अमेरिकेला पाठवली जाणारी मूर्ती साधारण 90 ते 95 डॉलर इतकी किंमत पडते. भारतीय चलनात याचा खर्च सुमारे 8,500 रुपये होतो. यात मूर्तीची किंमत, पॅकिंग आणि वाहतूक खर्च समाविष्ट असतो.
मंदार देसाई सांगतात, गणेशोत्सव हा फक्त धार्मिक उत्सव नाही, तर भावनिक नाळ जोडणारा आहे. परदेशात राहणाऱ्या लोकांना आपल्या घरच्या बाप्पाची मूर्ती मिळाली की त्यांना जणू पुण्यातल्या वातावरणाचीच अनुभूती होते.
पुण्याच्या कारागिरांनी बनवलेल्या गणेशमूर्तींना परदेशात मिळणारा प्रतिसाद ही परंपरेची जागतिक स्तरावर होत असलेली ओळख आहे. महाराष्ट्राचा गणेशोत्सव आज जागतिक कॅलेंडरवरील एक विशेष आकर्षण बनला आहे.
येत्या काही वर्षांत ही मागणी अजून वाढेल असा अंदाज आहे. कारण, परदेशातील मराठी मंडळींबरोबरच भारतीय संस्कृतीत रस असलेले इतर देशांचे नागरिकही या उत्सवात सहभागी होत आहेत. पुण्याच्या बाप्पांच्या या परदेशवारीमुळे गणेशोत्सवाचा आनंद आणि गौरव आता जगभर पसरत आहे.