दुषित पाण्यामुळे जीबीएसचा धोका वाढत चालल्याचं लक्षात आल्यामुळे पुणेकरांनी यापासून वाचण्यासाठी स्वत:च उपाययोजना करायचं ठरवलं आहे. सिंहगड रोड, आंबेगाव, नांदेड सिटी, नऱ्हे, धायरी आणि किरकिटवाडी या भागात जीबीएस रुग्णांची संख्या जास्त आहे. या भागातल्या नागरिकांनी टँकरचं पाणी पिण्याऐवजी मिनरल वॉटर विकत घ्यायला सुरूवात केली आहे.
पुणे महापालिकेकडून पुरेसा पाणीसाठा होत नसल्यामुळे रहिवाशांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागत होतं, पण जीबीएस रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे नागरिक टँकरच्या पाण्याऐवजी मिनरल वॉटर विकत घेत आहेत. टँकरच्या पाण्याची मागणी कमी झाल्यामुळे टँकर पुरवठादारांनी 2 ते अडीच हजार रुपयांचा दर एक हजार ते दीड हजार रुपयांपर्यंत कमी केला आहेत. नव्याने पुण्याच्या हद्दीत आलेल्या गावांना आम्ही 70 ते 80 टँकरनी पाणी पुरवत होतो, पण आता त्यांच्याकडून मागणी कमी झाली आहे, त्यामुळे आम्ही दर कमी केल्याचं टँकर पुरवठा करणाऱ्यांनी सांगितलं आहे.
advertisement
दुषित पाण्याचा धक्कादायक अहवाल
पुण्यामध्ये जीबीएस रुग्णांची संख्या वाढत असतानाच टँकरच्या पाण्याबाबतचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. महापालिकेच्या टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या सगळ्या टँकरच्या पाण्यात ई कोलाय आणि कॉलीफॉर्मचे विषाणू आढळून आले आहेत. 15 टँकर भरण्याच्या सगळ्या पॉईंट्वरून टँकरने होणारा सगळा पाणी पुरवठा दुषित असल्याचं या अहवालातून समोर आलं आहे.
किरकिटवाडी, नांदेड सिटी, धायरी या तिन्ही गावांना पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या टँकर पॉईंटची तपासणी करण्यात आली होती. रोज 200 पेक्षा जास्त टँकर या 15 पॉईंट्वरून भरले जातात. या पाण्यात ई कोलाय आणि कॉलीफॉर्मच्या विषाणूचं प्रमाण 16+ आहे. या पाण्याने विषाणू असण्याचा वरचा टप्पाही ओलांडला आहे. 16 + ही तपासणीची कमाल मर्यादा आहे, यानंतर प्रदुषित पाण्याची तपासणीही केली जात नाही. कारण हे पाणी पूर्णपणे दुषित या सदरामध्ये मोडतं.
या पाण्याचं क्लोरिफिकेशन झालेलं नाही, शुद्धीकरण झाल्याचे कोणतेही अंश अहवालामध्ये आढळलेले नाहीत. या पाण्याचा हार्डनेसही पिण्याच्या पाण्यापेक्षा जास्त आहे. 24 पीपीएम इतक्या हार्डनेसचं पाणी प्यायलं जाऊ शकतं, पण या पाण्याचा हार्डनेस त्यापेक्षाही जास्त आहे.