पुणे : पुणे शहरासह परिसरात काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटना शहरात घडल्या. पण यासोबतच शहरातील अनेक घरात चक्क साप शिरले. घरात शिरलेले चिखलयुक्त पाणी काढताना आता नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये कालपासून साप निघण्याच्या 26 घटना घडल्या आहेत. पुराचे पाणी जसे आपल्या घरात शिरते. तसे ते सापांच्या निवाऱ्यालाही उध्वस्त करते. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी साप वाट दिसेल तिकडे जातात. काहीवेळा साप पुराच्या पाण्यातून घरात जाऊन बसतात आणि पूर ओसरल्यावर लोकांना घरात सापांचाच सुळसुळाट दिसतो, अशी माहिती सर्पमित्र राजू कदम यांनी दिली.
advertisement
शहरात घुसले पाणी, काय आहे कोल्हापुरातील पुराची सद्य परिस्थिती? नागरिकांना दिलासा मिळणार का? VIDEO
ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली त्याठिकाणी साप दिसून आल्याने पावसानंतर अनेकांच्या मनात ही नवी भीती निर्माण झाली आहे. शिरलेले पाणी बाहेर काढण्याचे तसेच साचलेला गाळ काढण्याचे काम सध्या सुरू आहे आणि अशा परिस्थितीत विषारी तसेच निमविषारी साप आढळून येत आहेत. तरीही नागरिकांनी घाबरून न जाता सर्पमित्रांना बोलवावे, असे आवाहन केले जात आहे.
साप पकडणाऱ्यांच्या मते, साप अनेकदा गटारी आणि नाल्यांमध्ये राहत असल्याने, नाले ओसंडून वाहत असताना ते शौचालय किंवा स्नानगृहातून घरात प्रवेश करतात. तसेच कालपासून या पावसाच्या पाण्यातून 26 सापांची सुटका सर्पमित्रांनी केली आहे. पावसाळा हा रसेलच्या वाइपरचा जन्माचा काळ असल्याने आम्ही ज्या सापांची सुटका केली. त्यापैकी बरेच साप हे बाळ साप आहेत, असंदेखील त्यांनी म्हटले आहे. साप आढळून आल्यास घाबरून न जाता सर्पमित्रांना बोलवा, असे आवाहन करण्यात येत आहे.