पुणे: पुण्यातील शिक्रापूर परिसरात शनिवारी मध्यरात्री झालेल्या कारवाईदरम्यान पोलिस आणि कुख्यात गुन्हेगार लखन भोसले यांच्यात चकमक झाली. स्वतःच्या बचावासाठी केलेल्या पोलिसांच्या फायरिंगमध्ये भोसले गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या कारवाईत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सातारा शहर पोलीस स्टेशनची टीम फरार आरोपी लखन भोसलेच्या शोधासाठी शिक्रापूर येथे गेली होती. भोसलेवर साताऱ्यात 304(2) कलमान्वये गुन्हा दाखल होता. तो मूळचा पुसेगाव (जि. सातारा) येथील असून गेल्या काही महिन्यांपासून फरार होता. दरम्यान, पोलिसांनी शोधमोहीम राबवून त्याचे ठिकाण गाठले असता भोसले घराजवळ दिसला. मात्र पोलिसांना पाहताच त्याने चाकूने हल्ला केला.
advertisement
उपचारादरम्यान मृत्यू
या हल्ल्यात पोलीस कर्मचारी सुजित भोसले आणि तुषार भोसले जखमी झाले. तातडीने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हल्ल्यानंतर पोलिसांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी फायरिंग केले. यात लखन भोसले गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने सूर्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र प्रकृती बिघडल्याने त्याला ग्रामीण रुग्णालय, शिक्रापूर येथे हलवण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
लखन भोसलेवर तब्बल 34 गुन्हे
लखन भोसले हा ‘क्रिमिनल ऑन रेकॉर्ड’ असून त्याच्यावर तब्बल 34 गुन्हे नोंदवलेले आहेत. हे गुन्हे प्रामुख्याने पुणे जिल्ह्यात, तसेच काही शेजारील जिल्ह्यांमध्ये नोंद आहेत. यामध्ये खुनाचा प्रयत्न, दरोडे, चोरी, खंडणी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याचा नातेवाईक गुलाब भोसले देखील कारवाईदरम्यान उपस्थित होता. त्याच्यावरही पुण्यात गुन्हा नोंद आहे. लखन भोसले याच्यावर सातारा, सांगली, पुणे आणि इतर काही जिल्ह्यांत घरफोडी, दरोडे, चोरी, मारहाण अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. गुन्हेगारी जगतात त्याची दहशत होती.
शिक्रापूर परिसरात तणावाचे वातावरण
पोलिस अधिक्षक संदीपसिंह गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, “कारवाईदरम्यान आरोपीने अचानक हल्ला चढवला. आमच्या दोन पोलिसांना जखमी करून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आत्मरक्षणासाठी गोळीबार केला. यामध्ये आरोपी जखमी झाला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीच्या कुटुंबीयांकडून किंवा नातेवाईकांकडून पोलिसांवर कोणताही आरोप करण्यात आलेला नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. या कारवाईमुळे शिक्रापूर परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. मात्र पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. सातारा व पुणे ग्रामीण पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
हे ही वाचा :