मुंबईनंतर आता पुण्यातही म्हाडा बंपर घरांची लॉटरी जाहीर करणार असून, पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच पुणे जिल्ह्याच्या उपनगरांमध्ये घरे उभारण्याचे मोठे उपक्रम सुरू आहेत. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत पुणे जिल्ह्यात एकूण 35 हजार घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यापैकी 13 हजार 301 घरांचे बांधकाम म्हाडा करणार आहे.
जिल्हा प्रशासनाने रोहकल (खेड तालुका) आणि नेरे (मुळशी तालुका) येथे सुमारे 57 एकर सरकारी गायरान जमीन म्हाडाला सुपूर्द केली आहे. रोहकलमध्ये गट क्रमांक 22 मधील 15 हेक्टर 76 गुंठे आणि जिल्हा परिषद कडून मिळालेली 15 हेक्टर 46 गुंठे जमीन या प्रकल्पासाठी वापरण्यात येणार असून, येथे सुमारे 8 हजार घरे उभारली जातील. मुळशी तालुक्यातील नेरे भागात गट क्रमांक 117 आणि 118 मधील साडेसात हेक्टर जमीन मिळालेली असून, येथे 5 हजार 301 घरे बांधली जाणार आहेत.
advertisement
स्थानिक ग्रामपंचायतीकडून काही विरोध व्यक्त केला असला तरी, जिल्हा प्रशासनाने सर्व नियम आणि प्रक्रियेचे पालन करत प्रकल्प पुढे नेण्याचे ठरवले आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट तीन ते चार वर्षांत पूर्ण करणे आहे, तसेच जमीन सुपूर्द झाल्यानंतर तीन वर्षांत वापरात न आल्यास ती परत घेण्याची अट ठेवल्याचे अधिकारी सांगतात.
पुणे विभागीय सभापती शिवाजीराव आढळराव यांच्या मते, "रोहकल आणि नेरे येथील प्रकल्पांतून अंदाजे 13 हजार घरे उभारली जाणार आहेत. यातून काही घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब घटकांसाठी राखीव असतील." या योजनेमुळे पुण्यातील नागरिकांसाठी स्वतःचे घर घेण्याची स्वप्नसिद्धी अधिक जवळ येणार आहे.
म्हाडा प्रकल्पामुळे सामान्य नागरिकांना प्राईम लोकेशनवर घर खरेदी करण्याची संधी मिळणार असून, भविष्यातील रहिवासासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.