वाहतूक कोंडी होण्याची प्रमुख कारणं
हा भुयारी मार्ग दोन्ही चौकांना जोडतो आणि सुमारे 100 वर्षांपूर्वी बांधण्यात आला आहे. सध्याचा मार्ग फक्त पाच मीटर रुंद असून त्यातून एकाच वेळी फार कमी वाहने जाऊ शकतात. त्यामुळे येथे नेहमीच वाहतूक कोंडी होते. अनेकदा नागरिक रेल्वे स्टेशनला जाताना या कोंडीत अडकतात आणि ट्रेन चुकण्याची वेळ येते. तसेच या मार्गाची उंची कमी असल्याने मालधक्क्याकडे जाणारे मोठे ट्रक या मार्गाने जाऊ शकत नाहीत. त्यामुळे मालवाहतूक आणि इतर वाहनांची गर्दी दोन्ही चौकांत वाढते.
advertisement
वाहतूक कोंडीवर तोडगा; भुयारी मार्ग रुंदीकरणाचा प्रस्ताव तयार
या समस्येचा कायमस्वरूपी उपाय म्हणून पुणे महापालिकेने भुयारी मार्ग रुंद करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवले असून रेल्वेच्या मालकीची जागा वापरण्याची परवानगी मागितली आहे. आरटीओकडून मंगळवार पेठेकडे जाणाऱ्या बाजूला रेल्वेची काही जागा उपलब्ध आहे.
असा असेल नवीन भुयारी मार्ग
रेल्वेने ती जागा दिल्यास तेथे सुमारे नऊ ते दहा मीटर रुंदीचा नवा भुयारी मार्ग बांधता येईल. त्याचबरोबर सध्याचा जुना मार्गही मोठा करून त्याची रुंदी वाढवण्याचा विचार आहे. दोन्ही बाजूने मिळून जवळपास वीस मीटर रुंदीचा नवीन बोगदा तयार होईल, अशी महापालिकेची योजना आहे.
या कामामुळे आरटीओ चौक आणि शाहीर अमर शेख चौकातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि वाहनांची हालचाल अधिक वेगवान व सुरक्षित होईल. नागरिकांना स्टेशन, ससून रुग्णालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाण्यासाठी अधिक सोय होईल. प्रकल्प विभागाने सल्लागार नियुक्त करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. निवड झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत सल्लागार संस्था संपूर्ण आराखडा सादर करेल.
या आराखड्यात भुयारी मार्गाची अचूक रचना, आवश्यक जागेचे मापन, कामाचा अंदाजे खर्च आणि कामाची पद्धत यांचा सविस्तर तपशील असेल. अधिकाऱ्यांच्या मते हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील वाहतूक कोंडी कायमची सुटेल आणि पुणेकरांना मोठा दिलासा मिळेल.