पुणे : बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय चालणाऱ्या गल्लीतल्या अंधारात अनेकांचं आयुष्य गडप झालंय. हसू हरवलेले चेहरे, नशिबाच्या फासात अडकलेल्या स्त्रिया आणि त्यांच्या लेकरांचं दयनीय आयुष्य असंच सर्वसाधारण चित्र या ठिकाणी असतं. पण याच अंधारात एक आशेचा किरण अलका गुजनाळ यांच्या रूपाने आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या महिलांना सन्मानाचं जीवन जगता यावं म्हणून त्या प्रयत्न करत आहेत. महिला दिनी लोकल18 सोबत बोलताना त्यांनी याबाबतच माहिती दिली.
advertisement
लहानपणी अलका यांनी या गल्ल्यांमध्येच आपलं बालपण घालवलं. इथल्या स्त्रियांच्या आयुष्यातील संघर्षाच्या त्या साक्षीदार होत्या. पण त्या इतरांप्रमाणे या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून पुढे निघून गेल्या नाहीत. त्यांनी काहीतरी बदलायचं ठरवलं. त्या केवळ सहानुभूतीने थांबल्या नाहीत. त्यांनी इथल्या महिलांना जगण्याचा आत्मसन्मान मिळवून द्यायचा निर्धार केला. आज त्या महिलांसाठी, त्यांच्या मुलांसाठी काम करत आहेत. शिक्षण, रोजगार, आरोग्य सेवा अशा सगळ्याचा विचार त्या करतात आणि त्यांना मदत करतात.
दीड वर्षांचं बाळ अन् गंभीर आजार, काळजावर दगड ठेवून घेतला निर्णय, दहावी पास महिलेची मोठी भरारी
एका घटनेने बदललं आयुष्य
“या भागातच लहानाची मोठी झाल्याने या भागातील ताईंचे प्रश्न, त्यांना काय त्रास होतो? हे माहिती होतं. त्यांच्या अडचणी जवळून बघितल्या होत्या. लहान असताना एका ताईचा रस्त्यावर झालेला मृत्यू पाहिला होता. HIV सारख्या आजाराने त्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हा या ताईच्या सगळ्या वस्तू बाहेर टाकून दिल्या होत्या. जेवण पाणी देखील कोणी देत नव्हतं. हे डोळ्यांनी बघितलं. तेव्हाच असं कुठं तरी वाटलं की आपण या महिलांसाठी काम करायला पाहिजे. ही प्रेरणा मला माझ्या वडिलांकडून मिळाली होती. एका ताईच्या मुलीचं लग्न वडिलांनी लावून दिल होतं,” असं अलका सांगतात.
महिला, मुलांना मदत
या भागातील मुलं आणि महिलांना विविध प्रकारचे साहित्य स्वरूपाची मदत करत असते. यामध्ये मुलांना शालेय साहित्य, ताईंना साडी देणे आणि ज्या ताईचे कोणी नातेवाईक नसतील त्यांचे अंतिम संस्कार करण्याचं काम देखील करते. जनजागृती करणारे, आरोग्या विषयी माहिती देणारे अनेक उपक्रम घेत आहे. त्यांच्या सुख दुखत सहभागी होणं, त्यांना समजून घेणं, निखळ मैत्री निर्माण करण्याचं काम त्यांच्या सोबत करत आहे. हे करत असताना अनेक अडचणी येत असतात. त्यातून मार्ग काढत वाटचाल सुरू आहे, अशी माहिती समाजसेविका अलका गुजनाळ यांनी दिली आहे.