पुण्यात 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानां'तर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. या विशेष कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी महापालिका निवडणुकीबाबत भाकित वर्तवलं आहे.
'काही निवडणुका जानेवारीमध्ये होण्याची कदाचित शक्यता आहे. मी हे कदाचित म्हणून सांगतोय. हे अधिकार हे निवडणूक आयोगाचे असतात. मी फक्त माझं अंदाज वर्तवला आहे. उगाच अजितदादा म्हणाले असं म्हणू नका. ते अधिकार हे निवडणूक आयोगाचे आहे. साधारपणे डिसेंबरमध्ये आपलं अभियान संपेल. आणि त्याचवेळी नवीन समिती आलेली असेल, २०१७ नंतर निवडणूक व्हायला पाहिजे होत्या. पण २२ गेलं २३, २४ गेलं. आता पार २०२६ उजाडत आहे. पण, सगळ्या घटकाला संधी मिळाली पाहिजे, सुप्रीम कोर्टातही प्रकरण आहे. त्यामुळे हे सगळं लांबणीवर पडलं' असं अजितदादा म्हणाले.
advertisement
'मराठा आंदोलनाचं श्रेय घेऊ नका'
'आता लोक टपूनच बसलेले असतात. निवडणुकीमध्ये आपल्याला किती जागा आल्या हे तरी पाहिलं पाहिजे. आता मुंबईत चार-पाच दिवस आंदोलन सुरू होतं. त्याचंही श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न काही जणांनी केला. आता उत्तर मिळालं तर सगळे गप्पगार झाले आहे. परंतु, याचं काय मत आहे, याचा प्रयत्न सुरू आहे. पण सगळं काही ठीक होईल' असं म्हणत अजितदादांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लगावला.
'आदर्श व समृद्ध गावं घडतील'
तसंच, 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा मुख्य हेतू गावागावात विकासाची गंगा पोहोचवणं, ग्रामपंचायती सक्षम करणं आणि गावं स्वावलंबी बनवणं हा आहे. महात्मा गांधीजींनी संदेश दिल्याप्रमाणे भारताचा आत्मा खेड्यांत आहे. ग्रामपंचायत मजबूत झाली तर तालुका, जिल्हा, राज्य आणि अखेर देश सक्षम होतो, यावर माझा ठाम विश्वास आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांचं अभिसरण, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास व सामाजिक न्याय तसंच लोकसहभाग आणि श्रमदान या सात घटकांवर सखोल विचारविनिमय झाला. कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे. योजनांचा थेट लाभ सामान्य माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. ग्रामविकासात लोकसहभाग महत्त्वाचा आहे आणि त्यातूनच आदर्श व समृद्ध गावं घडतील' असंही यावेळी अजितदादा म्हणाले.