साडेतीन शक्तिपीठांच्या दर्शनासाठी विशेष बससेवा
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांना धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. नवरात्रौत्सवात दरवर्षी तुळजापूर, माहूरगड आणि सप्तश्रृंगी गड या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी येत असतात. याच पार्श्वभूमीवर पुणे विभागातील भाविकांना प्रवासाची सोय व्हावी, यासाठी राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) विशेष बससेवेची व्यवस्था केली आहे. भाविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
advertisement
Navratri 2025: नवरात्रौत्सवात पार्किंगचं टेन्शन नाही! अंबाबाई मंदिराजवळ सुरू होणार बहुमजली वाहनतळ!
प्रवासाचा तपशील
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने भाविकांसाठी खास उपक्रम राबवला आहे. 27 सप्टेंबरला सकाळी 6 वाजता पिंपरी-चिंचवड आगारातून विशेष बससेवा सुरू होणार आहे. या प्रवासात पिंपरी-चिंचवड, शिवाजीनगर, स्वारगेट, कात्रज, कोल्हापूर, सोलापूर, तुळजापूर, माहूरगड, सप्तश्रृंगी असा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा पिंपरी-चिंचवड येथे आगमन होणार आहे.
या प्रवासाचे भाडे 3,101 रुपये प्रति प्रवासी ठरवण्यात आले असून तुळजापूर, माहूरगड आणि सप्तश्रृंगी येथे मुक्काम असेल. मात्र, राहणे, जेवण आणि इतर खर्च प्रवाशांनी स्वतः करावयाचे आहेत. महिला सन्मान योजनेअंतर्गत एसटी बसमध्ये महिलांना 50 टक्के तिकीट सवलत मिळते. ही सुविधा या विशेष शक्तिपीठ दर्शन बसमध्येही लागू असणार आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
नवरात्रौत्सवात शक्तिपीठांचे दर्शन घेण्याची इच्छा असणाऱ्या भाविकांनी या विशेष बससेवेचा अवश्य लाभ घ्यावा ,असे आवाहन पुणे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी केले आहे.