सध्या या मार्गावर डांबरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून काही ठिकाणी काम पूर्ण झाले आहे. नव्याने टाकलेल्या डांबरामुळे वाहनचालकांना प्रवासाचा त्रास कमी झाला असून अनेकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान पिंपरी ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गाचे काम सध्या सुरू आहे. या प्रकल्पासाठी भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक, निगडी येथून चिंचवडच्या एम्पायर इस्टेटपर्यंत असलेला सुमारे 4.5 किलोमीटरचा सर्व्हिस रस्ता आणि बीआरटी मार्ग पिंपरी चिंचवड महापालिकेने महामेट्रोकडे हस्तांतरित केला आहे. त्यामुळे या रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी आता महामेट्रोवर आहे.
advertisement
पावसाळ्याच्या काळात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. मोठ्या वाहनांच्या वर्दळीमुळे आणि अपुऱ्या देखभालीमुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. वर्दळीच्या वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत, वाहतूक कोंडी होत होती. या त्रासाबाबत नागरिकांनी सातत्याने तक्रारी नोंदवल्या होत्या.
महापालिकेनेही परिस्थितीची दखल घेत तीनवेळा महामेट्रो प्रशासनाला पत्र पाठविले होते. मात्र, प्रारंभी कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. अखेर वाढत्या रोषाची दखल घेत महामेट्रोने रस्त्यांच्या दुरुस्तीस सुरुवात केली आहे.
स्थानिकांनी आता रस्ते पुन्हा खराब होऊ नयेत, यासाठी दर्जेदार काम व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दरवर्षी पावसाळा आला की रस्ते खड्डेमय होतात. थोडेसे काम करून पुन्हा तीच अवस्था होते. यावेळी कायमस्वरूपी तोडगा निघावा असे मत नागरिकांनी व्यक्त केले.
दरम्यान मेट्रोच्या विस्तारित मार्गाचे काम जोरात सुरू असून, दुरुस्त रस्त्यांमुळे कामाच्या गतीतही वाढ होईल असा अंदाज आहे. महामेट्रोकडून नियमित देखभाल केली गेल्यास हा मार्ग प्रवाशांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर ठरणार आहे. नागरिक आणि वाहनचालक आता या कामाची पूर्णता आणि टिकाऊपणाकडे आशेने पाहत आहेत.