आता एकाच स्मार्ट कार्डवर करता येणार प्रवास
हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून, ही सेवा मार्च 2026 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. प्रवाशांचा वेळ वाचावा आणि संपूर्ण पुणे शहरात एकसंध प्रवास सुविधा मिळावी, यासाठी प्रशासनाकडून वन पुणे कार्ड योजना राबविण्याची तयारी सुरू आहे. या कार्डच्या माध्यमातून प्रवासी मेट्रो, पीएमपी बस आणि हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो या सर्व सेवांचा वापर एकाच कार्डवर करू शकतील. पुढील काही महिन्यांत ही सुविधा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
advertisement
महामेट्रो आणि पीएमपीकडून ऑनलाइन तिकिट खरेदीसाठी स्वतंत्र बँकांच्या माध्यमातून पेमेंट स्वीकारले जाते. त्यामुळे दोन्ही यंत्रणांचे 'पेमेंट गेटवे' वेगवेगळे असल्याने व्यवहारात तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या. ही अडचण दूर करण्यासाठी सध्या प्रशासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. याबाबत पुणे मेट्रोसोबत बैठक घेण्यात आली असून, ‘वन पुणे कार्ड’ योजनेअंतर्गत एकत्रित पेमेंट प्रणाली लागू करण्याबाबत चर्चा झाली आहे. या उपक्रमामुळे महामेट्रो आणि पुणेरी मेट्रो या दोन्ही सेवांचा प्रवास सुरुवातीपासूनच एकाच कार्डच्या माध्यमातून करता येईल, अशी सुविधा निर्माण करण्याचे नियोजन सुरू आहे.
महामेट्रोतर्फे पुणे मेट्रो आणि पीएमपी बससेवा या दोन्ही संस्थांसोबत प्रवाशांना एकाच कार्डवरून प्रवास करता यावा, यासाठीचे काम सुरू आहे. या संदर्भात दोन्ही संस्थांशी चर्चा सुरू असून, तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.नवीन मेट्रो मार्ग सुरू होईपर्यंत पुणेकरांना ‘वन पुणे कार्ड’च्या माध्यमातून मेट्रो आणि पीएमपी बस प्रवास एकाच कार्डवर करता येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,अशी माहिती महामेट्रोचे अतिरिक्त महासंचालक चंद्रशेखर तांबवेकर यांनी दिली.