शहरांसह गाव खेड्या भागातही सध्या थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या थंडीचं कमबॅक झालेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून शाळेच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवडमधील शहरी भागातील सर्व शाळा सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत भरणार आहेत, असा महानगर पालिकेकडून शाळेच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सकाळी उशिरापर्यंत थंडी असते आणि संध्याकाळी लवकर अंधार पडतो.
advertisement
यामुळे, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या दृष्टीने महत्त्वाचा तोडगा काढला आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि आरोग्य विचारात घेऊन प्रशासनाने वेळेत कपात आणि बदल करण्याचा तोडगा प्रशासनाने काढला आहे. सकाळी कडाक्याची थंडी असल्यामुळे विद्यार्थी सकाळी घराबाहेर पडू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. सायंकाळी लवकर शाळा सुटल्यास विद्यार्थी अंधार पडण्यापूर्वी सुरक्षित आपल्या घरी पोहोचू शकतील.
विद्यार्थ्यांच्या शाळेतील वेळेत कपात केल्यामुळे विद्यार्थ्यांना पुरेशी विश्रांती मिळेल, परिणामी वर्गातील उपस्थिती वाढून शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा होण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पालकांची चिंता मिटली असून, मुलांनाही अभ्यासासाठी आणि विश्रांतीसाठी पुरेसा वेळ ही मिळणार आहे. शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी, मुख्यध्यापकांसाठी ही महत्त्वाचा नियम केला आहे. शाळेची वेळ बदलल्यानंतर वेळेआधीच शिक्षक आणि मुख्याध्यापकांना शाळेत हजर राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिक्षक व मुख्याध्यापकांनी अनियमितता दाखवल्यास त्यांच्यावर कारवाई सुद्धा होणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितलेय.
