अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही व्यक्तीने किंवा गटाने या मोहिमेचा विरोध केल्यास नियमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. तसेच अनधिकृत नळजोडणींवर कारवाई करण्यास गती देण्याचे निर्देशही दिले आहेत. यामध्ये घरगुती वापरासाठी पाणी मीटर बसविण्याचा खर्च पाणीपट्टीधारकांकडून पाणीबिलातून हप्त्यांमध्ये वसूल केला जाईल.
शहराची वाढती लोकसंख्या आणि मर्यादित पाणीसाठा लक्षात घेता प्रत्येक थेंब पाण्याचा अचूक हिशोब ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. पाणी मीटर बसवल्यामुळे पाणी वापराची आकडेवारी मिळेल आणि अनधिकृत वापर टाळता येईल. महापालिकेच्या मते, ही मोहीम शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन सुधारण्यासाठी आणि पाणी गळती कमी करण्यासाठी महत्त्वाची आहे.
advertisement
व्यावसायिक क्षेत्रावरही महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. हॉटेल्स, वॉशिंग सेंटर्स, बांधकामे, आर.ओ. प्लांट्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिकांनी अनधिकृत पाणी वापर थांबवणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे अनधिकृत नळजोडणी आहे. त्यांनी ती त्वरित नियमित करून पाणी मीटर बसवावा, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी नागरिकांना सांगितले की, पिंपरी चिंचवड शहराला पुरवण्यात येणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब मोजला जाणे आवश्यक आहे. पाणी मीटरमुळे पाणी वापराची अचूक आकडेवारी मिळेल, ज्यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे आणि अपव्यय टाळणे शक्य होईल. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करून पाणी मीटर लावावे.
एकूणच पिंपरी चिंचवड महापालिकेची ही मोहिम शहरातील पाणी वापराचे नियोजन सुधारण्यासाठी, अनधिकृत वापर रोखण्यासाठी आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सर्व नागरिकांनी वेळेत पाणी मीटर बसवून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे असे प्रशासनाने सांगितले आहे.