आतापर्यंत हा मार्ग पुणे स्टेशन ते कोंढवा खुर्द एवढाच मर्यादित होता. मात्र, आता या मार्गाचा विस्तार येवलेवाडीपर्यंत करण्यात आला आहे. यामुळे हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
बस थांबे आणि मार्ग
ही बस पुणे स्टेशन येथून सुटणार असून वेस्टएंड, महात्मा गांधी बसस्थानक, मिलिटरी हॉस्पिटल वानवडी, नेताजी नगर, लुल्लानगर, कोंढवा खुर्द, कोंढवा पोलिस स्टेशन, खडीमशीन, सिंहगड कॉलेज (कोंढवा रोड), कोंढवा हॉस्पिटल मार्गे येवलेवाडीपर्यंत धावणार आहे. या मार्गावर प्रवाशांना सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
advertisement
वेळापत्रक
पुणे स्टेशनहून पहिली बस पहाटे 4:58 वाजता सुटेल.
पुणे स्टेशनहून शेवटची बस रात्री 10:45 वाजता सुटणार आहे. यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत नागरिकांना प्रवास करता येणार असून कामावर जाणाऱ्या नोकरदारांसोबत विद्यार्थ्यांनाही मोठा फायदा होणार आहे.
नागरिकांची प्रतिक्रिया
येवलेवाडी परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर नवीन वसाहती, सोसायट्या आणि शैक्षणिक संस्था उभारल्या गेल्या आहेत. त्यामुळे येथील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. आतापर्यंत प्रवाशांना कोंढवा खुर्दपर्यंत बस मिळत होती, त्यानंतर पुढे जाण्यासाठी त्यांना खाजगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे वेळ आणि पैशांचा दोन्हींचा अपव्यय होत होता. मात्र, आता पीएमपीने थेट येवलेवाडीपर्यंत बससेवा उपलब्ध करून दिल्याने प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.
पीएमपीचा उद्देश
पुणे शहरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि लोकांना सार्वजनिक वाहतुकीकडे वळवण्यासाठी पीएमपीकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. दररोज लाखो प्रवासी पीएमपी बसने प्रवास करतात. त्यात नव्याने जोडल्या जाणाऱ्या मार्गांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ आणि किफायतशीर होत आहे.