27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरपर्यंत विशेष बससेवा
27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या 11 दिवसांच्या कालावधीत पीएमपीएमएलकडून प्रवाशांच्या सोयीसाठी रात्रपाळीत अतिरिक्त बसेस धावणार आहेत. या कालावधीत 270 जादा बसेस रात्रभर धावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ही सेवा संपूर्ण रात्री गर्दीनुसार सुरू राहणार आहे.
advertisement
प्रमुख ठिकाणांहून सुटणार विशेष बसेस
पिंपरी-चिंचवडमधील महत्त्वाच्या बसस्थानकांवरून या विशेष बसेस पुण्याकडे धावणार आहेत. निगडी येथून तब्बल 70 बसेस, भोसरीतून 62 बसेस, चिंचवडगावातून 35, तर डांगे चौक मार्गे चिंचवडहून 30 बसेस सुटणार आहेत. आकुर्डी रेल्वे स्थानकावरून 16, पिंपळे गुरव येथून 20, सांगवीतून 15, मुकाई चौक रावेतहून 12 आणि चिखली तसेच संभाजीनगर येथून 10 बसेस पुण्याकडे धावतील. या सर्व बसेस थेट पुणे मनपा भवन येथे प्रवाशांना घेऊन जाणार आहेत.
दोन टप्प्यांत बसेसचे नियोजन
पीएमपीएमएलकडून या विशेष बससेवेचे नियोजन दोन टप्प्यांत करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात 29 आणि 30 ऑगस्ट तसेच 5 सप्टेंबर या तीन दिवसांत एकूण 168 जादा बसेस धावणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात, म्हणजे 31 ऑगस्ट, 4 सप्टेंबर आणि 6 सप्टेंबर रोजी प्रवाशांच्या वाढत्या गर्दीनुसार तब्बल 620 हून अधिक बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
भाडे आणि पास नियम
ही सेवा यात्रा स्पेशल म्हणून सुरू होणार आहे. नियमित मार्गावरील बसेसपासून वेगळ्या ठेवून या फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. दुपारपाळीनंतर प्रवाशांना 10 रुपये अतिरिक्त भाडे आकारले जाणार आहे. तसेच, पासधारकांना पास रात्री 12 वाजेपर्यंतच वैध राहील. त्यानंतर तो मान्य होणार नाही. गौरींचे विसर्जन झाल्यानंतर पुण्यातील मंडळांची आकर्षक सजावट, भव्य देखावे आणि आरास पाहण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधून नागरिकांची मोठी गर्दी पुण्यात होत असते. पीएमपीएमएलने हाच विचार करून जादा बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.






