पुण्यातील गुन्हेगारी टोळ्या संपवण्यासाठी पोलिसांनी आंदेकर टोळीवर सर्वात मोठी कारवाई करायला सुरुवात केली आहे. पुण्याच्या नाना पेठेत आंदेकर टोळीकडून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केलं होतं. हेच बांधकाम आता तोडायला सुरुवात केली आहे. या पाडकामासाठी पुणे महानगरपालिका आणि पुणे पोलिसांचं पथक नाना पेठेत धडकलं आहे. संयुक्तपणे ही कारवाई करण्यात येत आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी या कारवाईला सुरुवात केली.
advertisement
खरं तर, आयुषची हत्या झाल्यापासून पुणे पोलीस या कारवाईची प्रक्रिया पूर्ण करत होती. हे बेकायदेशीर बांधकाम पाडण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं होतं. त्यासाठी महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात येत होता. संबंधित बांधकाम अनधिकृत असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात येत आहे.
नाना पेठेत ज्या ठिकाणी वनराज आंदेकरची हत्या झाली होती. त्याठिकाणी आंदेकर टोळीने वनराजचं मोठं बॅनर लावलं होतं. तसेच या परिसरात अनधिकृत बांधकाम देखील केलं होतं. पण याठिकाणी आंदेकर टोळीची प्रचंड दहशत असल्याने त्यांच्यावर कसलीही कारवाई करण्यात येत नव्हती. तिकडे जायलाही प्रशासन घाबरत होतं. मात्र आता हेच अनधिकृत बांधकाम पाडायला सुरुवात केली आहे. आंदेकर टोळी तुरुंगात असताना त्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्याने पुण्यातील गँगवॉरला चाप बसेल का? असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.