नेमकं प्रकरण काय?
तू मला पसंत नव्हतीस, मला लग्न करायचे नव्हते, घरच्यांनी जबरदस्ती केली म्हणून मी लग्न केले, असे सातत्याने बोलून नववधूचा मानसिक छळ केला. त्याबरोबरच हुंडा दिला नसल्याच्या कारणावरून नववधूस ४५ दिवसांत घराबाहेर काढणाऱ्या सासरच्यांनी सुनेस एकरकमी ४५ लाख रुपये पोटगी देण्याची तयारी न्यायालयात दर्शविली आहे. पत्नीनेही सासरच्यांविरोधातील कौटुंबिक हिंसाचारानुसार दाखल केलेला गुन्हा मागे घेतला. दाम्पत्याने परस्पर संमतीने केलेला घटस्फोटाचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला अन् कौटुंबिक हिंसाचारासह घटस्फोटाचा दावा अवघ्या एक वर्षात निकाली निघाला.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचा विवाह २९ जानेवारी २०२२ रोजी झाला. लग्नाच्या काही दिवसांनंतर लग्नात हुंडा दिला नसल्याच्या कारणावरून सासू, सासरा व नणंदेकडून विवाहितेचा छळ सुरू झाला. आरोपींनी विवाहितेस घराबाहेर काढले. त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी ती परत नांदण्यास आली असता तिला घरात घेतले नाही. पतीनेही फोन घेणे बंद केले. भेटण्यास टाळले. यादरम्यान, सासऱ्यांनी संपर्क साधत मुलाला दुसरे लग्न करायचे आहे, तुला नांदवायचे नाही, तू घटस्फोट दे म्हणून मानसिक त्रास दिला. याप्रकरणी, तिने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
या प्रकरणी कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तपासानंतर, आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. एकरकमी पोटगी देण्याच्या निर्णयानंतर तो गुन्हाही मागे घेण्यात आला. पण ४५ दिवसांच्या संसारासाठी ४५ लाख रुपयांची पोटगी द्यावी लागल्याने हे प्रकरण पुण्यात चर्चेचा विषय ठरत आहे.