पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बॉलर पब बाहेर शनिवारी रात्री मोठा गोंधळ उडाला. पाकिस्तानी गायकाला कॉन्सर्टसाठी बोलावण्यात आल्याच्या बातमीने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आणि त्यांनी ठिकाणी जोरदार आंदोलन छेडले. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सोशल मीडियावर फिरलेल्या एका पोस्टमध्ये ‘बॉलर पब’ येथे पाकिस्तानी गायकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती पसरली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी पबबाहेर धडक देत घोषणाबाजी केली. अचानक उफाळलेल्या या गोंधळामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
advertisement
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासाअंती समोर आलेल्या माहितीनुसार संबंधित गायक हा पाकिस्तानी नसून नेदरलँडचा असल्याचे निष्पन्न झाले. याशिवाय, तो गायक पुण्यात आला नसल्याचेही स्पष्ट झाले. फक्त गुगलवर शोध घेतल्यास त्याबाबत चुकीची माहिती दिसत असल्याने गैरसमज निर्माण झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अफवेमुळे गोंधळ उडाला असला तरी प्रत्यक्षात कोणताही पाकिस्तानी कलाकार कार्यक्रमासाठी आलेला नव्हता. चुकीच्या माहितीच्या आधारे आंदोलन करण्यात आले. परिस्थिती बिघडू नये यासाठी पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप करत आंदोलकांना समजावून सांगितले आणि परिसर पूर्णपणे शांत केला.
पाकिस्तानी गायकाला या पबमध्ये कार्यक्रमासाठी बोलावण्यात आल्याची माहिती मिळताच काही हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. पबबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले अन् त्यांनी घोषणाबाजी करत पब प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. हे मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये. अफवांमुळे तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते, त्यामुळे सत्य परिस्थितीची खात्री करूनच प्रतिक्रिया द्यावी. सध्या पब परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावरून पसरवल्या जाणाऱ्या अपप्रचाराच्या धोक्याबाबत चर्चा रंगू लागली आहे.