तीन टप्प्यांत पैसे ट्रान्सफर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किलारूने आयआयटी-बॉम्बेच्या एका माजी प्राध्यापकाचे नाव वापरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंना संपर्क साधला. तो स्वतः आयआयटी-बॉम्बेचा प्राध्यापक असल्याचे भासवून सरकारी प्रकल्पांसाठी निधी मिळवून देण्याचे आमिष त्याने दाखवले. या माजी कुलगुरूंनी एका शिक्षण संस्थेच्या मुख्य शिक्षण अधिकाऱ्याला त्याच्याबद्दल मेसेज पाठवला. त्यानंतर किलारूने त्या अधिकाऱ्याशी संपर्क साधून निधी मिळवून देण्याच्या बहाण्याने तीन टप्प्यांत पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितलं.
advertisement
दोन दिवस हैदराबादमध्ये तळ
फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर संस्थेने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी कॉल रेकॉर्ड्स आणि पैशांच्या व्यवहारांची तपासणी करून किलारूचा माग काढला. सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन दिवस हैदराबादमध्ये तळ ठोकून त्याला अटक केली. त्याला स्थानिक न्यायालयात हजर करून पुणे येथे आणण्यात आले असून, सध्या तो पोलीस कोठडीत आहे.
2022 पासून बेरोजगार
पोलिसांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, सीतय्या किलारूने 2010 ते 2014 या काळात लंडनच्या विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये मास्टर्स आणि पीएचडी केली आहे. त्याने हैदराबादमधील दोन विद्यापीठांत प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे. 2019-20 मध्ये त्याने यूपीएससी परीक्षाही दिली होती, पण मुलाखतीत तो अयशस्वी ठरला. 2022 पासून तो बेरोजगार होता आणि ऑनलाइन बेटिंगच्या व्यसनात अडकला, असं पोलिसांनी सांगितलं.
४९.८ लाख रुपयांचा ऐवज जप्त
दरम्यान, पोलिसांनी त्याच्याकडून १० डेबिट कार्ड्स, १३ बँक पासबुक्स, १५ चेकबुक्स, सोनं खरेदीची बिले, चार मोबाईल, एक टॅबलेट, लॅपटॉप आणि दोन कार्स असा एकूण ४९.८ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. त्याच्यावर तेलंगणामध्ये याआधीही फसवणुकीचे आणि आयटी कायद्याचे ८ गुन्हे दाखल आहेत. त्याने फसवणुकीचे २५ लाख रुपये आपल्या सासऱ्याला दिले असून, ते अजूनही जप्त करायचे बाकी आहेत. तसेच त्याने एका वर्षाचे घराचे भाडे आगाऊ भरले होते आणि २७ लाखांची नवीन कारही खरेदी केली होती.