हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ
पुणे न्यायालयाने वैष्णवी हगवणे यांना हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ करून आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या गंभीर गुन्ह्यात त्यांची सासू, नणंद आणि पतीचा मित्र अशा तीन आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे. या प्रकरणात न्यायालयाने काही गंभीर निरीक्षण नोंदवली आहेत, ज्यामुळे आरोपींना जामीन न देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी कोर्टाने चांगलंच फटकारल्याचं पहायला मिळालं आहे.
advertisement
दबावाशिवाय टोकाचा निर्णय घेऊ शकत नाही
केवळ नऊ महिन्यांच्या बाळाची आई दबावाशिवाय टोकाचा निर्णय घेऊ शकत नाही. आरोपींवर कटकारस्थान रचणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे, पुरावे नष्ट करणे असे गंभीर आरोप आहेत. त्यामुळे आरोपींना जामिनावर सोडल्यास साथीदारांवर दबाव येण्याची किंवा पुराव्यात छेडछाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे.
हुंडाबळी हा समाजावरचा मोठा कलंक
हुंडाबळी हा समाजावरचा मोठा कलंक आहे. हुंडाबळीमुळे समाजात विकृत मानसिकता निर्माण होते, अशी निरीक्षणे नोंदवीत हुंड्यासाठी मानसिक-शारीरिक छळ करून वैष्णवी हगवणेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिची सासू, नणंद आणि पतीच्या मित्राचा जामीन अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळला.
स्वत:च्या पत्नीचे अश्लील व्हिडीओ
या प्रकरणी पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला असता निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबीयापेक्षा मोठा राक्षस असल्याचं समोर आलं आहे. कारण त्यानेही अनेक वर्षे स्वत:च्या पत्नीचा छळ केला आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर तो स्पाय कॅमेऱ्याने स्वत:च्या पत्नीचे अश्लील व्हिडीओ शूट करायचा. त्याने अनेकदा पत्नीला मारहाण केल्याची देखील माहिती समोर आली आहे. या प्रकरणी निलेशच्या पत्नीने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. इतरही काही गुन्हे निलेशवर दाखल आहेत.