दुसरी घटना मुंढवा परिसरात घडली असून, एका ४७ वर्षीय व्यक्तीला ऑनलाइन टास्क आणि आभासी चलनात गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल २६ लाख रुपयांना लुबाडण्यात आले आहे. सुरुवातीला काही रक्कम गुंतवल्यानंतर त्यांना चांगला परतावा मिळत असल्याचे आभासी चित्र निर्माण करून चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले. मात्र, मोठी रक्कम गुंतवल्यानंतर कोणताही परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
advertisement
फसवणुकीची तिसरी घटना सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची ८ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. अशा प्रकारे पुण्याच्या विविध भागांत सायबर गुन्हेगार सक्रिय आहेत. कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका किंवा गुंतवणुकीच्या खोट्या आमिषांना बळी पडू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
