घरगुती साफसफाईसाठी वापरलं जाणारं ॲसिटिक ॲसिड या मुलाने अनावधानाने प्राशन केलं होतं. यामुळे त्याचे ओठ, तोंड, अन्ननलिका आणि छातीसह शरीराचे अंतर्गत भाग गंभीररीत्या भाजले गेले होते. श्वास घेण्यास होणारा त्रास आणि तीव्र वेदनांमुळे मुलाच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता. सुरुवातीला साताऱ्यात उपचार केल्यानंतर, प्रकृती अधिक बिघडल्याने पुण्यातील अंकुरा हॉस्पिटलचे पथक विशेष रुग्णवाहिकेद्वारे साताऱ्याला पोहोचलं. यानंतर मुलाला पुण्यात हलवण्यात आलं.
advertisement
जुन्नरमध्ये दहशत कायम! नदीच्या काठावर गेलेला शेतकरी; अचानक बिबट्यानं झडप घालून मांडी पकडली अन्...
बालरोग अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. मिलिंद जंवगी यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने या मुलावर उपचार सुरू केले. मुलाच्या शरीरावरील बाह्य जखमांसोबतच 'एंडोस्कोपी'द्वारे तपासणी केली गेली. यावेळी अन्ननलिकेलाही मोठ्या प्रमाणात इजा झाल्याचे समोर आले होते. हे उपचार अत्यंत आव्हानात्मक होते, कारण एकाच वेळी श्वसनमार्गातील अडथळा, अन्ननलिकेच्या जखमा आणि बाह्य संसर्ग या सर्वांवर नियंत्रण मिळवायचे होते.
सुरुवातीला मुलाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आणि अन्ननलिकेला अधिक त्रास होऊ नये म्हणून नळीद्वारे पोषण देण्यात आलं. हळूहळू प्रकृतीत सुधारणा झाल्यावर आणि गिळण्याची क्रिया पूर्ववत झाल्यावर त्याला तोंडावाटे आहार देण्यास सुरुवात झाली. छाती आणि जांघेवरील रासायनिक जखमांवर विशेष ड्रेसिंग करून आणि चोवीस तास तज्ज्ञांच्या देखरेखीखाली औषधोपचार केल्यामुळे हा चिमुरडा मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर आला आहे. डॉक्टरांच्या या यशस्वी कामगिरीमुळे पालक आणि वैद्यकीय क्षेत्रातून त्यांचे मोठे कौतुक होत आहे.
