मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार शंकर जगताप यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून वाकड ते मामुर्डी या परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित केला. या भागात गेल्या काही वर्षांत आयटी पार्क, शैक्षणिक संस्था तसेच मोठ्या गृहप्रकल्पांची मोठ्या प्रमाणात उभारणी झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरीकरण वेगाने वाढले असून वाहनांची संख्या देखील लक्षणीय वाढली आहे.
advertisement
महामार्गाची मर्यादित क्षमता, अपुरे सेपरेटर आणि आवश्यक ग्रेड सेपरेशन नसल्यामुळे स्थानिक रस्त्यांवरील वाहतूक आणि महामार्गावरील वाहने एकाच ठिकाणी एकत्र येतात. परिणामी या मार्गावर वारंवार तासनतास वाहतूक कोंडी होत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देत हा प्रश्न उपस्थित केला होता.
आठ ठिकाणी बॉक्स स्ट्रक्चर उभारणार
वाकड ते मामुर्डी दरम्यान होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या ठिकाणी अंडरपास उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. सयाजी अंडरपास, भूमकर चौक, ताथवडे, पुनावळे, पवना नदी क्रॉसिंग, किवळे जंक्शन आणि मामुर्डी या परिसरात एकूण आठ ठिकाणी बॉक्स स्ट्रक्चर उभारण्याचा विचार सुरू आहे.
या अंडरपासमुळे नागरिकांना महामार्ग ओलांडणे सोपे होईल तसेच सेवा रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे वाकड ते मामुर्डी या पट्ट्यातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल,अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.
प्रलंबित कामे लवकर मार्गी लावण्याची मागणी
हिंजवडी आयटी पार्कसह किवळे, रावेत, पुनावळे, ताथवडे आणि वाकड परिसरात गेल्या काही वर्षांत नागरीकरण झपाट्याने वाढले असून वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे महामार्गाशी संबंधित प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच वाकड ते मामुर्डी दरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून आठ ठिकाणी अंडरपास उभारणे गरजेचे आहे, असे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.






