पुणे : गेल्या 3-4 दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे शाळा, महाविद्यालयांनाही सुट्टी देण्यात आली. आता तर पावसाचा फटका पोलीस भरतीलाही बसला आहे. अकोल्यापाठोपाठ पुण्यातील पोलीस भरतीही तात्पुरती रद्द करण्यात आली आहे. तर, पिंपरी-चिंचवडमधील आजच्या दिवसाची (9 जुलै) भरती प्रक्रिया पूर्ण झालीये.
संततधार पावसामुळे पुणे विभागाची पोलीस भरती पुढे ढकलली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं पुण्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय. तसंच पुण्यात होत असलेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसानं मैदानात चिखल निर्माण झाल्यामुळे उमेदवारांना मैदानी चाचणी देताना दुर्घटनांना सामोरं जाऊ लागू शकतं. त्यामुळे पोलीस भरती पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
advertisement
हेही वाचा : Pune News : ऑडीतील 'त्या' एका गोष्टीमुळे झाली बदली; कोण आहेत पुण्याच्या IAS अधिकारी पूजा खेडकर?
9 ते 11 जुलै या कालावधीत होणाऱ्या पोलीस भरती चाचणीची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असं सांगण्यात आलंय. तर, दुसरीकडे 9 जुलै रोजी पिंपरी-चिंचवडमध्ये सकाळपासून लख्ख सूर्यप्रकाश पडल्यानं इथं भरतीप्रक्रिया पार पडली. आता 10 जुलै हा या प्रक्रियेचा शेवटचा दिवस आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड पोलीस प्रशासनानं दिली.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महिला, पुरुष, तरुण, तरुणी पोलीस व्हायचं स्वप्न उराशी बाळगून विविध ठिकाणी भरती प्रक्रियेला सामोरे जात आहेत. पुण्यात पोलीस शिपाई भरतीसाठी दाखल झालेल्या उमेदवारांनी भरती प्रक्रिया तात्पुरती रद्द केल्यानं नाराजी व्यक्त केलीये.






