स्मार्ट गावांच्या संकल्पनेअंतर्गत शेती, आरोग्य, कचरा व्यवस्थापन आणि आपत्कालीन सेवा या सर्व क्षेत्रांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. स्मार्ट शेती प्रकल्पांतर्गत ड्रोनद्वारे औषध फवारणी, पाण्याची व जमिनीची गुणवत्ता तपासणी, पिकांसाठी योग्य खतांची माहिती, तसेच पीक फेरपालटाविषयी शास्त्रीय सल्ला दिला जाईल. गावात स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करून तापमान, आर्द्रता आणि प्रदूषणाची माहिती रिअल टाइममध्ये उपलब्ध करून दिली जाईल.
advertisement
यासोबतच आरोग्य क्षेत्रातही स्मार्ट सुविधा दिल्या जाणार आहेत. पशुपालकांसाठी टेलिमेडिसिन सेवा सुरू करण्यात येणार असून, यामुळे ते थेट व्हिडिओ कॉलद्वारे पशुवैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकतील. तसेच कचरा व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन आणि कम्युनिटी सर्व्हिस सेंटर अधिक कार्यक्षम पद्धतीने चालविण्यासाठी डिजिटल प्रणालीचा अवलंब केला जाणार आहे.
चीन-जपानचे तांत्रिक सहकार्य
सोरतापवाडी गावातील 60 टक्के शेतकरी फळबाग शेतीशी संबंधित असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांना चीन आणि जपानकडून तांत्रिक सहकार्य मिळणार आहे. या दोन्ही गावांमध्ये वेगवान इंटरनेटसाठी स्वतंत्र टॉवर उभारून वाय-फाय सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. या प्रकल्पासाठी सुमारे 95 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, निधी जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध करून देण्यात येईल. काटेवाडीची लोकसंख्या सुमारे 10 हजार, तर सोरतापवाडीची 13 हजार आहे.
या प्रायोगिक उपक्रमामुळे ग्रामीण भागात डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकासाचे नवे दालन उघडणार असून, जिल्ह्यातील इतर गावेही भविष्यात या आदर्शावर आधारित स्मार्ट डिजिटल विकासाच्या दिशेने वाटचाल करतील, असा विश्वास गजानन पाटील यांनी व्यक्त केला.