बाणेर येथील 'सुप्रीम वेलनेसिया' सोसायटीमध्ये राहणाऱ्या प्रीती शहा यांनी आपले कपडे 'नंदनी लाँड्री' मध्ये दिले होते. याच कपड्यांमध्ये त्यांचे मौल्यवान दागिने विसरले गेले होते. कपड्यांची तपासणी करत असताना, लाँड्रीचे मालक सखाराम खिस्ते आणि त्यांचे सहकारी रमाबाबू कनोजिया यांना हे दागिने आढळले.
लाँड्री व्यावसायिकाची आर्थिक परिस्थिती फार चांगली नाही. मात्र, तरीही एवढी मोठी आयती संधी समोर आल्यावरही खिस्ते यांनी जराही विचार न करता, तत्काळ प्रीती शहा यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांचे दागिने प्रामाणिकपणे परत केले.
advertisement
पुणे लाँड्री व्यावसायिक संघाच्या सदस्य असलेल्या सखाराम खिस्ते यांच्या या अतुलनीय प्रामाणिकपणाचे बाणेर परिसरातील नागरिकांनी आणि संपूर्ण व्यावसायिक संघाने भरभरून कौतुक केलं आहे. तसंच त्यांच्या सचोटीला सलाम केला आहे. या कृतीने समाजातील विश्वासाची वीण अधिक घट्ट झाली आहे.
लाँड्रीतील या घटनेनं एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात, जिथे अनेकदा छोटीशी संधी मिळताच लोक इतरांची फसवणूक करतात, तिथे सखाराम खिस्ते यांनी १२ लाख रुपयांच्या मौल्यवान दागिन्यांचा मोह टाळून दाखवलेली ही सचोटी वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी केवळ दागिने परत केले नाहीत, तर आपल्या व्यवसायाची आणि समाजाची प्रतिमा उंचावली आहे. ही घटना इतरांसाठीही प्रेरणादायी ठरली आहे.
